Comparison of Raj Thackeray with Indira Gandhi, Jitendra Awhad's support of Raj Thackeray in ED case | राज ठाकरेंची तुलना इंदिरा गांधींशी, ईडीविरोधात जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका

राज ठाकरेंची तुलना इंदिरा गांधींशी, ईडीविरोधात जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी केंद्रीय गृहंमत्री पी. चिदंबरम यांची चौकशी म्हणजे एक राजकीय दबावतंत्र आहे. इंदिरा गांधी यांच्याबाबतही असच घडलं होत. इंदिरा गांधींना तुरुंगात टाकल्यानंतर इंदिरा गांधींना न माननारी लोकही इंदिरा गांधींच्या पाठिशी उभी होती, हे सरकारने विसरु नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवरील कारवाईविरुद्ध सरकारवर आरोप केले आहेत.  

कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी केला आहे. दमानियांच्या या टीकेला आता खुद्द  पवारकन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनीच नाव न घेता उत्तर दिलं आहे. त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं सांगत सरकारवर टीका केली. 

जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंना आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर रहायचे होते. त्यामुळे कार्यकर्ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाणे पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवलय. याच मनसे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड पोलिस स्टेशनला गेले होते. या सरकारने सुडाचे राजकारण सुरु केलय आणि त्याचा फटका सामान्य कार्यकर्त्यांना बसतोय. त्यामुळे सरकारने हे सुडाचे राजकारण बंद करावे. तपासात सर्व सत्य समोर येईल. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत ईव्हीएम हटाव सगळं सत्य बाहेर येईल, अस म्हटलंय.  

राज ठाकरेंची चौकशी सुरू असून अशा परिस्थितीत परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे त्यांच्या परिवारावर कोणी टिका करू नये. ईडी म्हणजे सरकारचा राजकीय स्टंट आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरू आहे ईडीच्या दबाव तंत्रामुळेच सर्व नेते सेना-भाजपात जात आहेत, असा आरोपही आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. 
 

 

Web Title: Comparison of Raj Thackeray with Indira Gandhi, Jitendra Awhad's support of Raj Thackeray in ED case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.