डाचकूलपाडा मध्ये ३१ रिक्षांच्या तोडफोड प्रकरणी भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:38 IST2025-10-30T09:37:26+5:302025-10-30T09:38:22+5:30
मीरारोडच्या डाचकुल पाडा येथे ३१ रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.

डाचकूलपाडा मध्ये ३१ रिक्षांच्या तोडफोड प्रकरणी भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या डाचकुलपाडा भागात दोन गटात झालेल्या राड्या प्रकरणी अखेर भाजपा सह शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर सदर गुन्हा दाखल करताना पोलिसांनी तोडफोडीची कलमे लावली नसून केवळ लाठ्या काठ्या घेऊन ९ व इत्तर आरोपींची मनाई आदेशाचे उल्लंघन केले त्याचे कलम लावले आहे.
मीरारोडच्या डाचकुल पाडा येथे ३१ रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यातून २१ ऑक्टोबरच्या पहाटे रिक्षा चालकांच्या टोळीने दांडे आदीने शांतीलाल उर्फ मंतेश यादव, त्याचे वडील सुक्कू व भाऊ सहदेव व परिचित सुमित साह ह्या चौघांना मारहाण केली. सुमित साह याच्या फिर्यादी वरून काशिगाव पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजीच ५५ ते ६५ रिक्षा चालक आदींवर गुन्हा दाखल करून ९ जणांना अटक केली होती.
सदर वादास धार्मिक रंग देण्याचा प्रकार काही बाहेरून आलेल्या तर काही परिसरातील राजकीय लोकांनी सुरु केल्याने वातावरण तंग बनले. तर रिक्षांच्या तोडफोड प्रकरणी मात्र गुन्हा दाखल केला जात नसल्याने राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप होत होता. तर रिक्षा रस्त्यात उभ्या करणे, महिला - मुलींची छेड आदी कारणांनी रहिवाश्यांचा रिक्षावाल्यां सोबत वाद होत असल्याचे येथील काही रहिवाश्यांनीच सांगितले होते.
काशिगाव पोलिसांनी अखेर २८ ऑक्टोबर रोजी स्वतःच फिर्यादी म्हणून गुन्हा नोंदवला आहे. भाजपाचे कार्यकर्ते असलेले सुकू यादव, मुलगा मंतेश यादव, सहदेव यादव, सुरेश यादव, दिनेश यादव, विवेक पटेल, सुरज यादव, सरिता यादव आणि शिवसेना शिन्देगटाच्या महिला पदाधिकारी रुबी साह व इतर यांनी हातामध्ये काठ्या घेऊन एकत्र बेकायदेशीर जमाव जमवून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. ३१ रिक्षांची तोडफोड झाली असल्याचे पोलिसांनी नमूद केले असताना केवळ मनाई आदेशाच्या उल्लंघनचा गुन्हा दाखल केला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महेश तोगरवाड ( वरिष्ठ निरीक्षक, काशिगाव पोलीस ठाणे) - पोलिसांनी मिळालेल्या व्हिडीओ व माहिती नुसार फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास आपण स्वतः करत असून ३१ रिक्षा तोडफोड घटनेत जसे साक्षीदार, पुरावे आणि आरोपी निष्पन्न होत जातील तसे कलम समाविष्ट केले जाईल.