बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 05:50 IST2025-10-06T05:50:25+5:302025-10-06T05:50:36+5:30
बांधकाम व्यावसायिक दीपक मेहता यांच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती कळवा पोलिसांनी रविवारी दिली.

बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा परिसरातील राज्य सरकारच्या जमिनीवर एका बांधकाम व्यावसायिकाने ३६ वर्षांपूर्वी तीन इमारती बांधून तेथील रहिवाशांची ४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीम्ड कन्व्हेएन्स म्हणजेच जमीन नावावर करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक मेहता यांच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, हा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती कळवा पोलिसांनी रविवारी दिली.
कळव्यातील श्री अमृत पार्क सोसायटीतील रहिवासी अरविंद पटवर्धन (७४) यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. बांधकाम व्यावसायिक दीपक मेहता यांच्यावर अरविंद पटवर्धन यांच्यासह ११२ सदनिकाधारकांची सुमारे ४४ कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. अमृत बिल्डर्स या भागीदारी संस्थेचे भागीदार दीपक मेहता, जयश्री मेहता, रमेश मेहता, केतन मेहता आणि प्रीती मेहता यांनी १९८९ मध्ये राज्य सरकारच्या चार हजार ३०० चौरस मीटर भूखंडावर तीन बेकायदा इमारती बांधून त्यातील सदनिकांची विक्री केली. अमृत पार्क, श्री अमृत पार्क आणि ओम अमृत पार्क अशी या तीन इमारतींची नावे आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करून सदनिकांची विक्री करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
असा उघड झाला घोटाळा
तिन्ही इमारती जुन्या झाल्याने त्यांच्या पुनर्विकासाची तयारी रहिवाशांनी सुरू केली. त्यासाठी जमीन नावावर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. जमिनीची मोजणीही केली. त्यावेळी बिल्डरने दिलेल्या जागेच्या ऐवजी दुसऱ्याच जागेवर इमारत उभी केल्याचे उघड झाले. भूमापन विभागातील नोंदीनुसार, अमृत बिल्डर्सने सर्व्हे १२ ऐवजी १७ वर या इमारती उभ्या केल्या. आता पुनर्विकासातही अडथळे निर्माण झाल्याने रहिवासी धास्तावले आहेत.
छत राहील की जाईल?
अमृत बिल्डर्सच्या दीपक मेहता यांच्यासह पाच जणांविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात ४४ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा २९ सप्टेंबर रोजी दाखल झाला. सदनिकाधारकांची दिशाभूल करीत दस्त नोंदणीकृत करून फसवणुक करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे आपल्या डोक्यावर छत राहाणार का, याबद्दल रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.