लाचखोर पाटोळेचे निलंबन; उमेश बिरारी नवे उपायुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 07:40 IST2025-10-05T07:40:10+5:302025-10-05T07:40:22+5:30
परिमंडळ २ उपायुक्तपदाचा कार्यभार दीपक झिंजाड यांच्याकडे

लाचखोर पाटोळेचे निलंबन; उमेश बिरारी नवे उपायुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पालिकेतील अतिक्रमण नियंत्रण विभागाचा उपायुक्त शंकर पाटोळे याला लाच प्रकरणात अटक झाल्यानंत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा पदभार उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे देण्यात आला आहे, तर परिमंडळ २ उपायुक्त पदाचा कार्यभार नव्याने रुजू झालेल्या उपायुक्त दीपक झिंजाड यांच्याकडे सोपविला आहे.
ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे याला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महापालिका वर्धापनदिनाच्या सायंकाळीच लाच घेताना अटक केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईची गंभीर दखल घेत पाटोळे याला २ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याबद्दलचा आदेश ४ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला.
आता शिस्तभंगाची कारवाईही केली सुरू
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून आयुक्त राव यांनी पाटोळे याला निलंबित केले. पाटोळे याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही सुरू केली आहे.
पालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग, सचिव विभाग, निवडणूक विभाग, माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे. या विभागांसह आता अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहेत.
उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि क्लस्टर सेलची जबाबदारी आहे. त्यांच्याकडील क्लस्टर सेलचा विभाग काढून तो उपायुक्त दीपक झिंजाड यांच्याकडे दिला आहे. याशिवाय, पाटोळे यांच्याकडे असलेला परिमंडळ २ चा कार्यभारही देण्यात आला आहे.
पाटोळे याला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी
ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचा उपायुक्त शंकर पाटोळे आणि ओमकार गायकर यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर, ठाणे पथकाने शुक्रवारी फरार असलेल्या सुशांत सुर्वे याला अटक करत, न्यायालयात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी पाटोळे आणि गायकर यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी वकील म्हणून ठाणे जिल्हा सरकारी वकील संजय लोंढे यांनी काम पाहिले.
सहायक आयुक्तांच्या बदल्या
नौपाडा प्रभाग समिती सहायक सोपन भाईक यांच्या समितीचा कार्यभार महेशकुमार जामनोर यांच्याकडे देण्यात आला आहे. भाईक यांच्याकडे अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभाग (मुख्यालय) सहायक आयुक्त कार्यभार देण्यात आला आहे. विजय कावळे यांच्याकडे मुंब्रा प्रभाग समिती, गणेश चौधरी वर्तकनगर प्रभाग समिती असा कार्यभार सोपविण्यात आला आहे.