व्यापारी भरत जैन हत्याप्रकरणी मुख्य सुत्रधाराच्या अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:55 PM2021-08-23T17:55:55+5:302021-08-23T17:56:27+5:30

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांचे पोलीस आयुक्तांना साकडे

bjp niranjan davkhare demand for arrest of mastermind in businessman bharat jain murder case | व्यापारी भरत जैन हत्याप्रकरणी मुख्य सुत्रधाराच्या अटकेची मागणी

व्यापारी भरत जैन हत्याप्रकरणी मुख्य सुत्रधाराच्या अटकेची मागणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येपाठोपाठ सोन्या-चांदीचे व्यापारी भरत जैन यांचीही हत्या करण्यात आली. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे केली आहे.

मनसुख हिरेन यांची एप्रिल मध्ये हत्या झाली होती. त्यापाठोपाठ चरईतील व्यापारी भरत जैन यांचीही हत्या झाल्याचे समोर आले. मनसुख यांच्याप्रमाणेच भरत यांचा मृतदेहही कळवा खाडीत टाकण्यात आला होता. या घटनेने ठाण्यातील व्यापाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे. या पाशर््वभूमीवर आमदार डावखरे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची सोमवारी भेट घेतली. या वेळी महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेविका तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी, जिल्हा सरचिटणीस विलास साठे, जैन समाजाचे प्रतिनिधी तथा व्यापारी अशोक बडाला आणि विकास अच्छा हेही उपस्थित होते.

भरत यांचे १४ ऑगस्ट रोजी अपहरण केले होते. त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने नौपाडा पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यावेळी त्यांना बेपत्ता होण्यास २४ तास झाल्यानंतर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी भरत यांच्या यांच्या दुकानाचे शटर तुटलेले आढळले. त्याच वेळी भरत यांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव कुटुंबियांना झाली होती. त्यांनी पोलिसांकडेही तातडीने तपास करण्याची मागणी केली होती. दुर्दैवाने, १८ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह कळवा खाडीत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे. मात्र, संबंधित तपास भरकटत असल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराऐवजी अन्य आरोपींना अटक केल्याचाही गंभीर आरोप या कुटूंबीयांनी केला आहे. तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे.
 

Web Title: bjp niranjan davkhare demand for arrest of mastermind in businessman bharat jain murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.