लोकमत साहित्य पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती सरकार विकत घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:19 IST2026-03-25T06:17:13+5:302026-03-25T06:19:03+5:30
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

लोकमत साहित्य पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती सरकार विकत घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मराठी साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांच्या लेखनाचा गौरव करणारे ‘लोकमत’ हे एकमेव मराठी वृत्तपत्र आहे. लोकमत साहित्य पुरस्कार मिळालेल्या ११ लेखकांच्या पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती सरकार विकत घेणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात केली. पाटील यांनी एकप्रकारे लोकमत साहित्य पुरस्कारांवर राज्य सरकाराची मोहोर उमटवली.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात राजहंस प्रकाशनचे प्रमुख दिलीप माजगावकर यांना मंत्री पाटील यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमतचा हा उपक्रम लेखकांना आणि प्रकाशकांना बळ देणारा आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या समितीने निवडलेली पुस्तके दर्जेदार असणार यात शंका नाही. ही पुस्तके महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत उपलब्ध व्हावी म्हणून आपण हा निर्णय जाहीर करत असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.
पुरस्काराला उत्तर देताना दिलीप माजगावकर यांनी वितरणातील अडचणी आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होत नसल्याकडे लक्ष वेधले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी लोकमत साहित्य पुरस्कार प्राप्त ११ पुस्तकांच्या प्रत्येकी ५०० प्रती सरकार विकत घेणार आहे. शक्य झाल्यास त्या वाढवून एक हजार प्रती घेऊ, असेही यावेळी बाेलताना त्यांनी सांगितले. मराठी साहित्य संस्कृतीची श्रीमंती दर्शविणारा हा दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. साेहळ्यासाठी साहित्यप्रेमींची माेठी गर्दी झाली हाेती.
‘लोकमत’मुळे राहीबाईंना दिले घर
‘लोकमत’ने बीजमाता राहीबाई पोपेरे यांना माझ्या हस्ते पुरस्कार दिला होता. तेव्हा त्यांनी, मला अनेक पुरस्कार मिळाले मात्र ते ठेवायला घरच नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यानंतर मी त्याचा पाठपुरावा करून त्यांना घर उपलब्ध करून दिले. हे ‘लोकमत’मुळे शक्य झाले, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून सांगितली. ‘लोकमत’च्या कार्यक्रमात ज्या गोष्टी समोर येतात, त्याची दखल सरकार गांभीर्याने घेते, हेच पाटील यांनी अधोरेखित केले.