मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 08:05 IST2025-12-05T08:04:00+5:302025-12-05T08:05:04+5:30
भाजपा ६५, शिंदेसेना १७ व उरलेल्या १३ जागा वाटून घ्यायच्या असा मेहतांचा जागावाटप फॉर्म्युला

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
धीरज परब
मीरारोड - आगामी मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने लढू अशी विधाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व भाजपा आमदार नरेंद्र मेहता करत आहेत. प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. माझी एका पायावर युती करायची तयारी असून आमच्या ६५, शिवसेनेच्या १७ व उरलेल्या १३ जागा वाटून घ्यायच्या असं जागावाटपचे सूत्रच आमदार मेहता यांनी सांगितले परंतु मंत्री सरनाईक यांनाच युती करायची नाही असा टोलाही लगावला.
मीरा भाईंदर हा एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यातही प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील नागरिकांची शहरातील संख्या लक्षणीय असून २०१४ साली मोदी पर्वाने येथील मतदारांचा कल भाजपाकडे वाढला. त्यातूनच महापालिकेत २०१७ साली चार सदस्य पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा फायदा भाजपाला झाला आणि भाजपाचे तब्बल ६१ नगरसेवक निवडून आले. भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेचे २२ व काँग्रेस १२ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेतून ४ तर काँग्रेस मधून ३ असे ७ नगरसेवक भाजपात गेले आहेत. भाजपातील दोन नगरसेवक शिंदेसेनेत गेले असून गीता जैन ह्यांनी अजून तरी अन्यत्र प्रवेश केलेला नाही. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेसेनेत १५ नगरसेवक आहेत. भाजपातून आलेल्या दोघांना मोजले तर १७ नगरसेवक शिंदेसेनेकडे आहेत. भाजपाकडे गीता जैन यांना वगळले तर ५८ आणि सेना - कॉग्रेस मधून आलेले ७ असे ६५ नगरसेवक आहेत.
एकहाती सत्ता असताना भाजपाकडून सरनाईक व सेनेची बरीच अडवणूक झाल्याचे आरोप नवीन नाहीत. त्यातूनच मंत्री सरनाईक व आ. मेहता यांच्यात एकमेकांवर आरोप व टीका सुरु असतात. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता मंत्री सरनाईक व आ. मेहता हे महायुतीने लढायची तयारी असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. परंतु युतीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा मात्र झालेली नाही. आ. मेहता यांनी सांगितले की, पक्षाने युती करायची की नाही हे स्थानिक नेत्याने ठरवावे असे सांगितलेले आहे. मी एका पायावर युती करायला तयार आहे. ते वरती युती बाबत बोलायला गेले तरी तिकडून माझ्याशी बोला असेच उत्तर त्यांना मिळेल. त्यांना युतीची बोलणी करायला माझ्याकडेच यावे लागणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण मला कॉल करून युती बाबत मत विचारले. त्यांना सुद्धा तुमच्याकडे असलेले नगरसेवक तेवढ्या जागा तुम्ही लढवा, आमच्याकडे जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या जागा आम्हाला द्या असे व्यावहारिक सांगितले. शिंदे यांनी देखील तुमचे बरोबर आहे सांगितल्याचे आ. मेहता म्हणाले.
आमचे ६५ नगरसेवक असल्याने त्याजागा आम्ही घेतो आणि तुमचे १७ नगरसेवक असल्याने त्या जागा तुम्ही घ्या. उरलेल्या १३ जागा दोघे वाटून घेऊ. एका सेकंदात युतीचा निर्णय होऊन पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून टाकू. परंतु मंत्री सरनाईक हे केवळ लोकांना दाखवायला महायुतीची भाषा करत आहेत. ते युती करणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे. १७ जागा घेऊन ते काय लढणार. माजी आमदार गीता जैन आमच्याच आहेत कारण अजून त्या दुसऱ्या पक्षात गेलेल्या नाहीत अशी गुगली देखील आ. मेहतांनी सोडली. तर दुसरीकडे मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करू असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.