भाजपाच्या ठिय्या आंदोलनातून दिवावासीयांचा पाणीटंचाईवर संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:43 IST2021-10-05T15:40:07+5:302021-10-05T15:43:48+5:30
Water scarcity in diva : दिवा परिसरात अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

भाजपाच्या ठिय्या आंदोलनातून दिवावासीयांचा पाणीटंचाईवर संताप
ठाणे - दिवा परिसरातील तीव्र पाणीटंचाईबाबत नागरिकांचा संताप भाजपाच्या आंदोलनातून उघड झाला. आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची महापालिका प्रशासनाने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. दिवा परिसरात अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे दाद मागण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर भाजपातर्फे आज दिव्यात हंडा-कळशी मोर्चा काढण्यात आला होता.
आंदोलनात दोन आमदारांचा सहभाग होता. मात्र, मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. त्यावेळी संतप्त होऊन भाजपाचे कार्यकर्ते व नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महापालिकेला सामान्य नागरिकांविषयी आस्था नसल्याचेच उघड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. अखेर या आंदोलनाची दखल आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतली. मात्र, ते मुंबईत सुनावणीमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना दिव्यात निवेदन स्वीकारण्यासाठी पाठविले. तसेच दिव्यातील पाणीटंचाईबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील, दिवा मंडल अध्यक्ष आदेश भगत, विजय भोईर, विनोद भगत, अशोक पाटील, रोहिदास मुंडे, गणेश भगत, दिवा महिला अध्यक्ष अर्चना पाटील, सुप्रिया भगत, रेश्मा पवार, संगीता भोईर, सीमा भगत,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.