भिवंडी महापालिका महापौरपद निवडणुकीत घोडेबाजार; काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:34 PM2019-12-05T16:34:49+5:302019-12-05T16:44:58+5:30

भिवंडी महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्यात आली.

Bhiwandi Municipal Corporation Mayor Pratibha Vilas Patil and Deputy Mayor Imran Khan wins | भिवंडी महापालिका महापौरपद निवडणुकीत घोडेबाजार; काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले

भिवंडी महापालिका महापौरपद निवडणुकीत घोडेबाजार; काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले

googlenewsNext

भिवंडी: भिवंडी महापालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आर्थिक घोडेबाजार अखेर चव्हाट्यावर आला असून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या आहेत तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान हे विजयी झाले आहेत . त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.  

भिवंडी महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्यात आली. महापौर पदासाठी कॉग्रेस तर्फे रिषिका राका व भाजप - कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात असल्याने पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय ( एकतावादी ), समाजवादी पक्ष व भाजप बरोबरच काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी कोणार्कच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मतांनी विजयी झाल्या. तर शिवसेना काँग्रेस युतीच्या नगरसेविका रिषिका राका यांना अवघी 41 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. 

विशेष म्हणजे भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने त्यांचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस व शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले आहे. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजप व कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना 49 मते मिळाली . त्यांनी सेनेचे जैष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला . चौधरी यांना 41 मते मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे.
 
भिवंडी महापालिकेत 90 नगरसेवक असून त्यामध्ये कॉग्रेसचे 47, शिवसेना 12, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 4, समाजवादी पार्टी 2, आरपीआय (एकतावादी ) 4, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसकडे बहुमत असूनही नगरसेवक फुटीची शक्यता लक्षात घेता 2017 मध्ये काँग्रेसने शिवसेनेच्या 12 नगरसेवकांना सोबत घेऊन सेनेला सत्तेत वाटा दिला होता . त्यामुळे भाजप व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. विधानसभेपाठोपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीची सत्ता ठिकठिकाणी स्थपन होत असतांना बहुमत असूनही काँग्रेस शिवसेनेला भिवंदि महापालिकेत सत्तेपासून दुररहावे लागले आहे . त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भिवंडीतून जोरदार धक्का बसला आहे. 

खराब रस्ते व वाहतूक कोंडीचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फटका 

भिवंडी महानगर पालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक गुरुवारी दुपारी 12 वाजता मुबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती मात्र भिवंडीतील खराब रस्ते व वाहतूककोंडीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी या निवडणुकीसाठी उशिरा पोहचल्याने हि निवडणूक जवळपास 20 मिनिटे उशिरा सुरु झाली . 

निवडणूक प्रक्रिया सुरु असतांना काँग्रेस पक्षाचे व्हीप वाटप 

दरम्यान या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अंसारी यांनी सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरु असतांना काँग्रेसच्या नगरसेवकांना जबरदस्तीने पक्षाचे व्हीप वाटप सुरु केले त्यावर काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांनी आक्षेप घेत व्हीप वाटपाचे काम बंद पाडले.विशेष म्हणजे काँग्रेसगटनेते हलीम अन्सारी यांनी सुरुवातीला काँग्रेस उमेदवार रिषिक राका यांच्या नावाने दोन दिवसांपूर्वी पक्षाचा व्हीप जाहीर केला असतांना आज प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशीच वर्तमानपत्रात कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा विलास पाटील यांना मतदान करा अशी जाहिरात खुद्द काँग्रेस गटनेत्यांनी दिल्याने तंटा निर्माण झाला होता. मात्र काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अंसारी यांनी सदरचा दुसरा व्हीप हा खोटा असून विरोधकांनी केलेले कारस्थान आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . मात्र दोन दोन व्हीप जाहीर केल्याने महापौर व उपमहापौर निवडणुकीत होणार आर्थिक घोडेबाजार देखील चाव्हत्यावर आला आहे.  

Web Title: Bhiwandi Municipal Corporation Mayor Pratibha Vilas Patil and Deputy Mayor Imran Khan wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.