ठाणे: "एक गोर सव्वा लाखेर जोर", "आरक्षण आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं" अशा जोरदार घोषणा देत बंजारा समाजाने आज ठाण्यात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अनुसूचित जमातीत (एसटी) समावेशाच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा "सेमी फायनल" असून, अंतिम एल्गार १७ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर होईल, असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला.
हा मोर्चा कापूरबावडीपासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. शासकीय विश्रामगृहासमोर अडवण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो बंजारा महिला, पुरुष आणि तरुणाई पारंपरिक वेशभूषा घालून सहभागी झाली होती. हातात झेंडे घेऊन घोषणां देत मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या आरक्षण धोरणावर आक्रमकता व्यक्त केली.
मोर्चाला संबोधित करताना हरिभाऊ राठोड म्हणाले, "हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज 'आदिम जमात' म्हणून नोंदवलेला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्रासाठी हेच गॅझेट ग्राह्य धरले गेले, मग आम्हालाच डावलले का? आंध्र, कर्नाटक, बिहारमध्ये बंजारा समाज एसटीमध्ये आहे. महाराष्ट्रातही तसाच निर्णय व्हावा, यासाठी आमची मागणी आहे."
तीव्र आंदोलनाचा इशारा
"सरकारने तातडीने बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करताच जीआर काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल," असा सज्जड इशारा राठोड यांनी दिला. "शिवाजी पार्कवरील फायनल मोर्चा सरकारला समाजाच्या ताकदीची जाणीव करून देईल," असंही त्यांनी म्हटलं. या मोर्चात बंजारा नेते शंकर पवार, नंदू पवार, कविराज चव्हाण, सुभाष राठोड, छाया राठोड, राकेश जाधव आदींसह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.
राज्यभर आंदोलनाची मालिका सुरू
या मोर्चानंतर बंजारा समाज लातूर, यवतमाळ (6 ऑक्टोबर), परभणी, जळगाव (7 ऑक्टोबर), धुळे (8 ऑक्टोबर), नाशिक, वर्धा आणि अलिबाग (10 ऑक्टोबर) येथेही मोर्चे काढणार आहेत. या सर्वांचा शेवट 17 ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे होणार आहे.
Web Summary : Banjara community rallied in Thane demanding ST status, threatening intensified protests if demands aren't met. A final demonstration is planned at Shivaji Park.
Web Summary : बंजारा समुदाय ने ठाणे में एसटी दर्जे की मांग के लिए रैली निकाली, मांगें पूरी न होने पर तीव्र विरोध प्रदर्शन की धमकी दी। शिवाजी पार्क में अंतिम प्रदर्शन की योजना है।