भाईंदरमध्ये ४५ वर्षे जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली; अडकलेल्या ७२ जणांना काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 17:45 IST2021-05-18T17:38:11+5:302021-05-18T17:45:19+5:30
Bhayander News : ३९ सदनिका आणि १० दुकाने असून यातील ३ सदनिका बंद होत्या तर ३६ सदनिकांमध्ये लोक राहात होते.

भाईंदरमध्ये ४५ वर्षे जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली; अडकलेल्या ७२ जणांना काढलं बाहेर
मीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे कोसळणाऱ्या मुसळधार पाऊस आणि वादळीवाऱ्याचा तडाखा शहरातील जुन्या धोकादायक इमारतीला बसला आहे. भाईंदर पश्चिमेस ४५ वर्ष जुन्या ४ मजली इमारतीच्या सामूहिक बाल्कनीचा भाग कोसळला. पालिकेच्या अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या ७२ जणांना त्यांच्या सामानासह बाहेर काढले. त्यानंतर पालिकेने सदर इमारत पूर्णपणे तोडण्यास घेतली आहे. पश्चिमेच्या शिवसेना गल्ली नाक्यावरच महेश नगर क्रमांक २ ही १९७५ सालची चार मजली इमारत आहे. सदर इमारत अतिशय जीर्ण व धोकादायक अवस्थेत असली तरी त्यात राहणाऱ्या सामान्य कुटूंबियांनी थोडीफार डागडुजी व रंगरंगोटी करून त्यात रहात होते,
३९ सदनिका आणि १० दुकाने असून यातील ३ सदनिका बंद होत्या तर ३६ सदनिकांमध्ये लोक राहात होते. चक्रीवादळाने जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह पडत असल्याने मंगळवारी पहाटे सुमारे ५.३५ वाजता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सार्वजनिक बाल्कनीचा भाग पडला. तो खालच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्याच्या बाल्कनीवर पडल्याने त्या दोन्ही मजल्याच्या बाल्कनी सुद्धा कोसळल्या. काही सदनिकांच्या जिन्याच्या समोरचा भाग पडल्याने लोक आतमध्ये अडकले.
पावणे सहाच्या सुमारास अग्निशन दलास माहिती मिळताच दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे हे अधिकारी व जावानांसह घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्यास सुरुवात केली. जवानांनी इमारतीत अडकलेल्या ७२ जणांना आधी बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे सामान काढून देत सदनिका रिकामी केल्या. आमदार गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले, पोलीस निरीक्षक मुकुट पाटील, नगरसेवक रवी व्यास व पंकज पांडेय सह पालिका अधिकारी आदींनी पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेतला.
इमारतीतून सुखरूप बाहेर काढलेल्यांची तातडीने भाईंदर सेकंडरी शाळेत राहणे व खाण्यापिण्याची पालिकेने व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयुक्त म्हणाले. तर सदर कुटुंबीयांची एमएमआरडीएच्या भाडे तत्त्वावरील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी आमदार गीता जैन, नगरसेवक रवी व्यास आदींनी केली आहे. तर प्रभाग समिती कार्यालयाने इमारतीच्या अध्यक्ष व सचिवांना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे पत्र देऊन सुद्धा ते करण्यात आले नाही असे समोर आले आहे. मुळात सदर इमारत जुनी व धोकादायक असल्याने ती पडून आजूबाजूच्या इमारतींना व लोकांना धोका होऊ नये म्हणून दुपारनंतर पालिकेने सदर इमारत तोडायला घेतली. आयुक्तांनी शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.