बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:55 IST2026-01-10T13:53:55+5:302026-01-10T13:55:12+5:30
Badlapur Municipal Council, Rape case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांना नगरसेवक पद दिल्याने मनसे आक्रमक. अविनाश जाधव यांनी जाहीर केला भाजपविरोधात मोर्चा. वाचा सविस्तर.

बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप
ठाणे/बदलापूर: बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याची भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केल्याने राजकीय वातावरण पेटले आहे. या निर्णयाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपविरोधात थेट मोर्चाची घोषणा केली आहे.
"ज्या व्यक्तीवर पोक्सोसारखे गंभीर गुन्हे आहेत, त्याला सत्तेच्या खुर्चीवर बसवणे हा बदलापूरकरांचा अपमान आहे," अशी तोफ मनसेने डागली आहे. तुषार आपटे हे केवळ आरोपी नाहीत, तर त्यांनी अत्याचाराची माहिती दडपण्याचा प्रयत्न केला होता. अशा कलंकित व्यक्तीचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करावे, ही मनसेची प्रमुख मागणी आहे. जर भाजपने ही नियुक्ती मागे घेतली नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाला होता. मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर, शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी हा प्रकार लपवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ४० दिवस फरार राहिल्यानंतर अटक झालेले आपटे सध्या जामिनावर बाहेर आहेत. आता त्यांना भाजपने राजकीय अभय दिल्याचा आरोप मनसे आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. भाजपच्या या 'नैतिकतेवर' प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनसेने आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपची कोंडी होण्याची शक्यता
एकीकडे 'लाडकी बहीण' योजनेचा प्रचार करणाऱ्या सत्ताधारी भाजपला, आता आपल्याच नगरसेवकाच्या नियुक्तीवरून बचावात्मक पवित्रा घ्यावा लागणार आहे. मनसेच्या या मोर्चामुळे बदलापूरच्या राजकारणात भाजपची मोठी कोंडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.