बदलापूर-कर्जत चौपदरीकरण; केंद्राने २ मार्गांना दिली मंजुरी; कल्याण-बदलापूर मार्गिकेचे काम ३० टक्के पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:29 IST2025-11-27T06:28:49+5:302025-11-27T06:29:13+5:30
केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जत दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पावर १३२४ कोटी रुपये खर्च येणार आहे

बदलापूर-कर्जत चौपदरीकरण; केंद्राने २ मार्गांना दिली मंजुरी; कल्याण-बदलापूर मार्गिकेचे काम ३० टक्के पूर्ण
मुंबई : रेल्वे प्रवासातील गर्दीची समस्या कमी करण्यासाठी महत्त्वाच्या कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. तर बदलापूर ते बदलापूर-कर्जत दरम्यान ३२ किमीची तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून एमयुटीपी ३ ए अंतर्गत कल्याण-बदलापूर प्रकल्पाचे काम सुरू आहे. यात अस्तित्त्वात असलेल्या दुहेरी मार्गासोबत दोन नवे मार्ग तयार केले जात आहेत. यामुळे मोक्याच्या वेळांत लोकलच्या वाढीव फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. या मार्गिकेचे चौपदरीकरण झाल्यानंतर कल्याण-कर्जत संपूर्ण पट्ट्यावर उपनगरीय वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जत दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पावर १३२४ कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील ५० टक्के खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे.
लवकरच निविदा प्रक्रिया
एमआरव्हीसीने दिलेल्या माहितीनुसार, मंजुरीनंतर बदलापूर-कर्जत प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असून, पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. या दोन प्रकल्पांमुळे कल्याण-कर्जत मार्गावरील प्रवासी क्षमतेत वाढ होऊन प्रवाशांना अधिक फेऱ्या आणि वेळापत्रकातील नियमितता अनुभवायला मिळणार आहे.
कल्याण-बदलापूर चौपदरीकरणाची प्रगती
विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरण पूर्ण.
सिग्नलिंग इमारती उल्हासनगर व अंबरनाथ येथे अंतिम टप्प्यात.
रेल्वे कर्मचारी निवासासाठी सहा मजली इमारतींच्या कास्टिंगल प्रगतीपथावर.
प्रकल्पातील पूल - २१ पूल पूर्ण.
स्टेशन विकास (चिकलोली) - स्टेशन इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब पूर्ण.
विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, चिकलोली आणि बदलापूर या पाचही स्थानकांचा आराखडा मंजूर
प्रकल्पाची एकूण किंमत - १५१० कोटी
प्रकल्पाची लांबी - १४ किमी