बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या समाधीला पोलीस संरक्षण; २४ तास जागता पहारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:55 IST2025-07-04T17:54:16+5:302025-07-04T17:55:56+5:30
पोलीस अधिकाऱ्याकडून घेतला जातो आढावा.

बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या समाधीला पोलीस संरक्षण; २४ तास जागता पहारा
उल्हासनगर :बदलापूर शालेय मुलीच्या अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदे यांच्यावर उल्हासनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. हे प्रकरण न्यायालय प्रविष्ट असल्याने, प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत शिंदे याच्या समाधीवर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नजर तर २४ तास पोलीसांचा जागता पहारा कायम आहे.
बदलापूर येथील नामांकित शाळेतील मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला. एन्काऊंटरवर प्रश्नचिन्हे उभे ठाकून मयत अक्षय शिंदे यांच्यावरील अंत्यविधीळा बदलापूर व अंबरनाथ वाशियांनी विरोध केला. त्यानंतर उल्हासनगर येथील स्मशानभूमीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान शिंदे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, त्याच्या समाधीवर गेल्या १० महिन्यापासून सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर असून जागता पहारा देण्यासाठी दोन पोलीस व ऐक महापालिका बोर्डाचा सुरक्षा रक्षक २४ तास तैनात आहेत. पोलिस व सुरक्षा रक्षकाला वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण मिळण्यासाठी शिंदे याच्या समाधी समोर ऐक पत्राची झोपडी व ऐक पत्र्याचा कंटेनर बॉक्स बांधण्यात आला. रात्र-दिवस पोलीस समाधीवर जागता पहारा देत असून पोलीस उपायुक्त दररोज याबाबत आढावा घेतात.
एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाने पोलिसावर ताशेरे ओढून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शांतीनगर स्मशानभूमी सारख्या निर्जनस्थळी पत्र्याचा कंटेनर व ताडपत्रीच्या झोपडीत राहून अक्षय शिंदे यांच्या समाधीचे संरक्षण गेल्या १० महिन्या पासून पोलीस व महापालिका सुरक्षारक्षक करीत आहेत. तसेच समाधीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दररोज अहवाल व माहिती दिली जाते. जो पर्यंत न्यायालयाचा शिंदे प्रकरणी निकाल लागत नाही. तोपर्यंत रात्र-दिवस व २४ तास डोळ्यात अंजन घालून या निर्जनस्थळी समाधीचा पहारा द्यावा लागणार आहे. याठिकाणी विविध विषारी सापाचा वावर असल्याची माहिती तैनात असलेले पोलीस देतात. मात्र नाईलाजाने याठिकाणी पहारा द्यावा लागत असल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.