लिफ्ट का थांबवली नाही? संतप्त इसमाची १२ वर्षीय मुलाला मारहाण, चावाही घेतला, घटना CCTVमध्ये चित्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:13 IST2025-07-09T17:12:52+5:302025-07-09T17:13:54+5:30
Ambernath Crime News: इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली जात असलेली लिफ्ट थांबवली नाही म्हणून संतापलेल्या एका इसमाने १२ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करून त्याच्या हाताचा चावा घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये घडली आहे.

लिफ्ट का थांबवली नाही? संतप्त इसमाची १२ वर्षीय मुलाला मारहाण, चावाही घेतला, घटना CCTVमध्ये चित्रित
इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली जात असलेली लिफ्ट थांबवली नाही म्हणून संतापलेल्या एका इसमाने १२ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करून त्याच्या हाताचा चावा घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये घडली आहे. अंबरनाथमधील पालेगाव येथील पटेल जेनॉन हौसिंग प्रोजेक्टच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला असून, पीडित मुलाच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शंकरलाल पांडे यांचा मुलगा त्यागी पांडे हा ४ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. तो १४ व्या मजल्यावरून लिफ्टने खाली जात होता. वाटेत लिफ्ट नवव्या मजल्यावर थांबली. तेव्हा समोर कुणीच दिसत नसल्याने त्यागी याने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान, नवव्या क्रमांकावर राहणारा कैलाश थवानी हा लिफ्टमध्ये घुसला. त्याने संतापाच्या भरात त्याची याला मारायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्याने त्यागी याच्या हाताचा चावाही घेतला. यादरम्यान लिफ्टध्ये असलेल्या महिला हाऊसकिपरने प्रसंगावधान दाखवत लिफ्ट ग्राऊंड फ्लोअरवर थांबवली आणि त्यागी याला बाहेर काढलं. मात्र संतापलेल्या कैलाश याने लॉबीमध्ये गेल्यावरही त्यागी याला मारहाण केली.
या घटनेनंतर त्यागी याच्या आईने त्याला घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी आरोपीवर केवळ अजामिनपात्र कलमं लावून तक्रार नोंदवून घेतली. अखेरीस कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर चार दिवसांनंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेबाबत स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.