महायुतीतील तिन्ही पक्षांना लागले स्वबळाचे डाेहाळे; ठाणे महापालिकेत भाजपचा ‘अब की बार ७० पार’ नारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:01 IST2025-10-17T08:58:31+5:302025-10-17T09:01:01+5:30
इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांची मागणी

महायुतीतील तिन्ही पक्षांना लागले स्वबळाचे डाेहाळे; ठाणे महापालिकेत भाजपचा ‘अब की बार ७० पार’ नारा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिंदेसेनेकडून ठाण्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली असून, भाजपच्या गुरुवारी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांनी ‘अब की बार ७० पार’ असा नारा देत स्वबळावर लढण्याची मागणी केली.
ठाणे शहरातील १८ मंडळांमधून तब्बल ४१६ इच्छुक उमेदवारांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. या मार्गदर्शन शिबिरात आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे तसेच शहराध्यक्ष संदीप लेले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उमेदवारांना संघटन बळकट करणे, प्रचार तंत्र, मतदारांशी थेट संवाद आणि प्रभागनिहाय नियोजन या बाबींचे मार्गदर्शन केले.
भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. आमदारही भाजपचे अधिक आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्याही मनाचा विचार करावा लागणार असल्याचे मत आ. केळकर यांनी व्यक्त केले.
‘कार्यकर्त्यांना संधी मिळावी’
भाजपचे जिल्हाध्यक्ष लेले यांनी शिबिरातील घोषणांबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले, युती हवी की नको, याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जातो.
इच्छुक उमेदवारांची माहिती घेणे आणि परिचय पत्र भरणे ही नियमित संघटनात्मक प्रक्रिया आहे. ‘अब की बार ७० पार’ हा नारा हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा भाग आहे. याचा युतीच्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले. आम्ही युती तोडणारे नाहीत, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. आता कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.
महापालिकेतील निर्णय
ठाणेकरांच्या हितासाठी असावेत
शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या बैठकीबाबत त्यांना विचारले असता, जोर बैठका या सुरूच राहतात, असे त्यांनी सांगितले. मात्र, पालिकेतील निर्णय ठाणेकरांच्या हितासाठी असावेत, जेथे भ्रष्टाचार, अन्याय दिसेल तिथे आम्ही ठामपणे लढू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.