अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 07:24 IST2026-01-10T07:23:03+5:302026-01-10T07:24:38+5:30
एका रात्रीत पालटले सत्तेचे समीकरण, संख्याबळ ३२ वर पोहोचले. आता उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिंदेसेनेकडेच राहतील.

अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित १२ नगरसेवकांना हाताशी धरून शिंदेसेनेला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला शिंदेसेनेने प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या चार नगरसेवकांना सोबत घेत शिंदेसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. ५९ नगरसेवकांच्या या नगरपालिकेत शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) यांचे संख्याबळ आता ३२ झाले. आनंद आश्रम येथे दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
आधी काय घडले?
नगरपालिकेत शिंदेसेनेचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले होते. एका अपक्षाच्या साथीने त्यांचे संख्याबळ २८ वर पोहचले होते. सत्तास्थापनेसाठी त्यांना दोन नगरसेवकांची आवश्यकता असताना, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला साथ दिली होती. नैसर्गिक युती डावलून भाजपने काँग्रेससोबत युती केल्याचा दावा शिंदेसेनेकडून करण्यात आला होता.
सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट
गुरुवारपर्यंत भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार)च्या चार नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेला समर्थन दिले. त्यामुळे शिंदेसेनेचे संख्याबळ ३२ वर पोहोचले. काँग्रेसमधून निलंबित १२ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केल्याने भाजपचे संख्याबळ ३१ वर पोहोचले. आता उपनगराध्यक्ष, विषय समित्या शिंदेसेनेकडेच राहतील.
भाजपने घात केला
निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः फोन करून तुम्ही उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सुचवा, तसे आश्वासन दिले. त्यानुसार तयारी केली. परंतु, गाफील ठेवून त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आमचा घात केला. - डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण.