अंधश्रद्धाळू कुटुंबीयांकडूनच करून घेतली जातात अघोरी कृत्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:31 AM2020-07-28T00:31:50+5:302020-07-28T00:31:56+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समिती : जादूटोणाविरोधी कायद्यानंतर मांत्रिकांनी बदलली कार्यपद्धती

Aghori acts are committed by superstitious families | अंधश्रद्धाळू कुटुंबीयांकडूनच करून घेतली जातात अघोरी कृत्ये

अंधश्रद्धाळू कुटुंबीयांकडूनच करून घेतली जातात अघोरी कृत्ये

Next

मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यानंतर मांत्रिक, तांत्रिकांनी आपली कार्यपद्धती बदलली. अगोदर अनेक अघोरी उपाय किंवा शिक्षा स्वत:च्या हाताने करणारे मांत्रिक, तांत्रिक आता तेच प्रकार त्यांच्या जाळ्यात फसलेल्या गोरगरीब, अंधश्रद्धाळू लोकांच्या हातून करवून घ्यायला लागले आहेत. कल्याणमधील अटाळी परिसरातील घटनेतही मांत्रिकाने हे दुहेरी हत्याकांड त्यांच्या नातलगांकडून करवून घेतले. त्यामुळे आता तो कायद्याच्या कचाट्यातून सुटेल व पुन्हा आपला गोरखधंदा करायला मोकळा होईल, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य उत्तम जोगदंड यांनी व्यक्त केले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिच्या लगतच्या कल्याणमधील आंबिवली-अटाळी येथे भूत अंगात शिरल्याने ते उतरवण्याकरिता तिघेजण मांत्रिकाच्या सांगण्यावरून मायलेकाला ठार करतात, ही अत्यंत शरमेची घटना आहे, असे जोगदंड म्हणाले. लहानपणापासून माणसाच्या मनात भीती रुजवली जाते. पुढे याच भीतीचा गैरफायदा बुवा, बाबा, तांत्रिक आणि मांत्रिक घेतात, असे जोगदंड म्हणाले. एखादा लहान मुलगा रडू लागला, तो घराबाहेर जाण्याचा हट्ट करू लागला, तर त्याला बाहेर भूत आहे, असे सांगितले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्यामुळे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे हे प्रकार आता बरेच नियंत्रणात आले आहेत. तरीदेखील, आजही समाजातील अशिक्षित व शिक्षित समाजाचा बुवाबाजी, मांत्रिकांवर विश्वास आहे. समाजातील शिक्षित व अशिक्षितांमध्ये अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित नाही. ती मागास व सवर्ण समाजांतही दिसून येते. कर्जतच्या एका बुवाने नाशिकच्या सुशिक्षित मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. माझे ऐकले नाही तर तुझे आईवडील मरतील, अशी भीती तिच्या मनात निर्माण करून तिच्याकडून १४ लाख रुपये उकळले होते. एखाद्याला असाध्य आजार झाल्यावर डॉक्टरांच्या प्रदीर्घ उपचाराऐवजी मांत्रिकाकडे धाव घेतली जाते. मांत्रिक व तांत्रिकाचा पगडा इतका प्रचंड आहे. अटाळीतील घटनेत मांत्रिकाच्या सांगण्यावरून कुटुंबातील तिघांनी त्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांना ठार केले. मारहाण केल्यावर आपल्या रक्ताची माणसे जीवानिशी जातील, याचेही भान जवळच्या नातलगांना राहत नाही, याचे कारण त्यांचा मांत्रिकावर बसलेला अंधविश्वास हेच आहे. जादूटोणाविरोधी कायदा आल्यानंतर मांत्रिक, तांत्रिकांनी त्यांची कार्यपद्धती बदलली आहे. ते आता सल्ला देतो, असे भासवून लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. अटाळीच्या घटनेत मुख्य गुन्हेगार तो मांत्रिक आहे. मात्र, प्रत्यक्ष हत्या कुटुंबातील तिघांनी केल्याने मांत्रिक किरकोळ शिक्षा होऊन बाहेर येईल व पुन्हा नवे सावज जाळ्यात ओढायला मोकळा होईल. त्यामुळे पोलिसांनी मांत्रिकालाही कठोर शिक्षा होईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे जोगदंड म्हणाले. अनेक बुवा अंधश्रद्धा समितीच्या रडारवर आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात ठोस पुरावा पोलिसांना सादर करावा लागतो. तो मिळत नाही. विशेष म्हणजे साक्षीदार मिळत नाहीत. त्यामुळे या बुवाबाबांच्या विरोधात कारवाई करणे शक्य होत नाही. मध्यंतरी, टिटवाळ्याच्या एका बाबाला समितीने पकडून दिले होते. त्याच्याविरोधातील खटला न्यायप्रविष्ट आहे. कल्याण भागात आमच्या समितीचे काम वर्षभर सुरू आहे. समितीला कार्यकर्त्यांची चणचण जाणवते. तरीही, समितीचे काम प्रभावीपणे सुरू आहे. शाळा-कॉलेजमध्ये समिती कार्यक्रम घेते. त्याठिकाणी विद्यार्थ्यांना तुमच्या व तुमच्या घरातील काही समस्या असल्यास समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करते. तरीदेखील, अशा प्रकारच्या घटना अधूनमधून डोके वर काढतात.

आपली समाजरचना व मानसिकताच अशी आहे की, कोणालाही भुताळा व भुताळी ठरवता येते. अंगात येणे हा दृश्य स्वरूपातील भाग मानला जातो. मात्र, या भावना मनावर परंपरावादी विचारांतून रुजविल्या आहेत. जोपर्यंत विज्ञानाचा आधार घेतला जात नाही, सत्य पडताळले जात नाही, प्रबोधन होत नाही, तोपर्यंत ही मानसिकता बदलता येत नाही. घरात पैसा थांबत नाही, नोकरी मिळत नाही, त्यासाठी मांत्रिकाचा आधार घेणे व एखाद्याला ठार मारणे, हे विकृत आहे. धर्म व ईश्वर या कल्पनेशी या गोष्टी जोडलेल्या आहेत. ईश्वर या संकल्पनेतून बाहेर पडता येत नाही. ही मानसिकता सुशिक्षित समाज ठेवतो, तर आदिवासी भागांतील स्थितीची कल्पना केलेली बरी. - प्रा. विठ्ठल शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक

एकविसाव्या शतकाला विज्ञानवादी, संगणकाचे युग बोलतो. तरीही, या घटना घडतात, हीच बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार अजूनही समाजात रुजला नाही, हेच यातून उघड होते. संपत्ती हडपणे, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी. गडचिरोलीला तर महिलेला डाकीण
संबोधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जातो.
अटाळीतील घटना ही केवळ अघोरी अंधश्रद्धेचे
बळी नसून, तो एक मॉब लिचिंगचा प्रकार म्हणायला हवा. ही घटना अत्यंत भयानक आहे.
- सिंधू रामटेके, सुप्रसिद्ध साहित्यिका

Web Title: Aghori acts are committed by superstitious families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.