महेश आहेर हल्ल्याप्रकरणी अभिजित पवार तडीपार, दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यांतून हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:23 IST2023-05-16T13:23:04+5:302023-05-16T13:23:36+5:30

त्यांच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे. 

action on Abhijit Pawar in Mahesh Aher attack case, exiled from five districts for two years | महेश आहेर हल्ल्याप्रकरणी अभिजित पवार तडीपार, दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यांतून हद्दपार

महेश आहेर हल्ल्याप्रकरणी अभिजित पवार तडीपार, दोन वर्षांसाठी पाच जिल्ह्यांतून हद्दपार

ठाणे : ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक  अभिजित पवार यांना दाेन वर्षांसाठी मुंबई ठाण्यासह पाच जिल्ह्यांतून तडीपार केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी साेमवारी दिली. त्यांच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे. 

आहेर यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अभिजित यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चाैघांवर ठाण्यासह मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून हद्दपारीची नोटीस अलीकडेच नाैपाडा विभागाच्या सहायक आयुक्तांनी बजावली होती. या चौघांपैकी अभिजित याच्यावर १२ मे २०२३ राेजी तडीपारीची कारवाई पाेलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी केली. त्यांना सातारा येथील  वठार या गावी नौपाडा पोलिसांच्या पथकाने १५ मे राेजी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी तडीपारीची नाेटीस बजावली तेव्हाच या कारवाईबद्दल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी तीव्र संताप व्यक्त केला हाेता. 

आहेर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुली व जावयाच्या हत्येची सुपारी दिल्याबाबत एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या हेमंत वाणी यांच्यासह चौघांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आहेर यांना मारहाण केली होती. 
 

Web Title: action on Abhijit Pawar in Mahesh Aher attack case, exiled from five districts for two years