अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्या आराेपीला २४ तासात अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: December 5, 2025 23:22 IST2025-12-05T23:21:43+5:302025-12-05T23:22:59+5:30
वर्तकनगर पाेलिसांची कामगिरी: पैसे मागितल्याच्या रागातून फरशीने डाेक्यावर प्रहार

अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्या आराेपीला २४ तासात अटक
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अनैतिक संबंधातून ५० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या मनाेज सैंदाणे (४२, रा. लाेकमान्यनगर, पाडा क्रमांक ३, ठाणे) याला अटक केल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांनी शुक्रवारी दिली. खर्चायला पैसे मागितल्याच्या रागातून या महिलेच्या डाेक्यावर त्याने प्रहार करुन
तिचा खून केल्यानंतर त्याने पलायन केले हाेते. लाेकमान्यनगर, परेरानगर येथे ही पिडित महिला तिच्या २७ वर्षीय मुलासह वास्तव्याला आहे. तिच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. आराेपी मनाेज आणि तिचे मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध हाेते. यातूनच त्यांच्यात काही वादविवादही हाेते. ५ डिसेंबर राेजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या दाेघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. तिने त्याच्याकडे लाेकमान्यनगर येथे खर्चायला काही पैसे मागितले. त्यास त्याने नकार दिल्याने त्यांच्यातील वाद विकाेपाला गेला.
यातूनच त्याने तिच्या डाेक्यावर फरशीने जबर मारहाण केली. यात जबर जखमी झाल्याने तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या वर्तकनगर पाेलिसांना मनाेज याने तिच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पेालीस निरीक्षक प्रविण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पेालीस निरीक्षक याेगेशकुमार शिरसाठ, प्रशांत शिर्के आणि सुहास राणे आदींच्या पथकाने मनाेज याला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.