महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा; आनंद परांजपेंनी दिला इशारा

By रणजीत इंगळे | Published: February 25, 2023 05:57 PM2023-02-25T17:57:31+5:302023-02-25T18:00:17+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगनंतर महेश आहेर यांना ठामपाच्या सेवेतून बडतर्फ ...

A march in Mumbra for the dismissal of Mahesh Aher | महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा; आनंद परांजपेंनी दिला इशारा

महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा; आनंद परांजपेंनी दिला इशारा

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगनंतर महेश आहेर यांना ठामपाच्या सेवेतून बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, सय्यद अली अश्रफ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा-कळवा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो मुंब्रावासीय सहभागी झाले होते.  

मागील आठवड्यात महेश आहेर यांची एक ऑडिओ क्लीप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये महेश आहेर हे डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी आपण शूटर तैनात केले असल्याचे सांगत आहेत. या ऑडिओ क्लीपमुळे डॉ. आव्हाड यांच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतरही पोलीस कारवाई करीत नसल्याने मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दारुल फलाह मस्जीद ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा मूक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो स्त्री-पुरुष काळे कपडे परिधान करुन तसेच डोक्याला काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते. 

यावेळी, “ ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची जी ऑडिओ क्लीप वायरल झाली आहे. त्या संभाषणात राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची मुलगी, त्यांचे जावई यांच्या हत्येची सुपारी दाऊदचा हस्तक बाबाजी याला देण्यात आलेली आहे. या संदर्भात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आघाडीवर असणार्‍या पोलिसांकडून महेश आहेरवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याचा आक्रोश म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता.   डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विकासकामे करुन मुंब्य्राचा कायापालट केला आहे. त्यामुळे मुंब्रा येथील जनता डॉ. आव्हाडांवर प्रेम करते, हे दाखविण्यासाठीच आज रस्त्यावर उतरली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा पुरविण्याची घोषणा करुन दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, ही सुरक्षा देण्यात आलेली नाही. तसेच, तक्रार करुनही गुन्हा दाखल केला जात नाही. यावरुन ठाणे पोलिसांची हतबलता आणि दुर्बलता दिसून येते,” अशी टीका यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी करुन आज हा मोर्चा मूक आहे. पण, जर वेळीच कारवाई झाली नाही तर हा मोर्चा उग्रही होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.   

शमीम खान यांनी, डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कन्या महेश आहेर यांनी दिलेल्या सुपारीमुळे प्रचंड व्यथित झालेली आहे. किंबहुना, तिच्या पतीचे आईवडील प्रचंड घाबरलेले आहेत. त्यामुळे आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करीत आहोत की, त्यांनी तत्काळ नताशा आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांन पोलीस संरक्षण द्यावे. आज सबंध मुंब्रा वासीयांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. त्याकडे पाहून तरी पोलिसांनी महेश आहेर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.  

मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, मा. विरोधी पक्षनेते शानू पठाण, मा. नगरसेवक सिराज डोंगरे, नादिरा यासीन सुर्वे, हफिजा नाईक,  शेख जाफर नोमानी, सुलोचना पाटील, रुपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, आशरिन राऊत, जमीला नासीर खान, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, महिला विधानसभाध्यक्षा साबिया मेमन यांच्यासह हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते.
 

Web Title: A march in Mumbra for the dismissal of Mahesh Aher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.