ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाला बिष्णाेई टाेळीच्या नावाने मागितली दहा कोटींची खंडणी, नाैपाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:36 IST2026-02-21T20:36:35+5:302026-02-21T20:36:51+5:30
पोलिसांकडे तक्रार केल्यास ‘एन्काऊंटर’ करण्याचीही दिली धमकी...

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाला बिष्णाेई टाेळीच्या नावाने मागितली दहा कोटींची खंडणी, नाैपाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा
ठाणे: बिष्णाेई ग्रुपमधून बाेलत असल्याचा दावा करीत ‘दस कराेड भेज दाे, यदी नही भेजा, ताे मरनेके लिए तयार रहाे.. रेकाॅर्ड कराे, या पुलिस काे जाके बता दाे, तेरा एन्काऊंटर पक्का है’ अशी धमकी बिष्णोई टोळीच्या नावाने ठाण्यातील एका बिल्डरला व्हाट्सएप कॉलवरुन देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून आराेपीचा शाेध घेण्यात येत असल्याचे नाैपाडा पाेलिसांनी शनिवारी सांगितले.
ठाण्यात राहणाऱ्या या ६० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने २० फेब्रुवारी २०२६ राेजी नाैपाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीनिमित्त पूजेच्या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशातील सतना जिल्हयातील शिवराजपूर येथे यातील तक्रारकर्ते व्यावसायिक असतांना त्यांना एका आंतरराष्ट्रीय माेबाईल क्रमांकावरून व्हाट्सअँपवर दुपारी काही कॉल आले होते. मात्र पूजेच्या कार्यक्रमात असल्यामुळे त्यांनी हे कॉल घेतले नाही. त्यानंतर त्यांना सायंकाळी ७.१६ ते ७.३५ वाजेच्या दरम्यान पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आले. यावेळी त्यांनी फोन घेतला असता त्यावर बोलणाऱ्या व्यक्तीने बिष्णाेई ग्रृपमधून बाेलत असल्याचा दावा करीत दहा काेटींची मागणी केली. पेसे पाठविले नाहीतर मरण्यास तयार तयार रहा, अशी हिंदी भाषेत धमकी दिली. त्यानंतर हे व्यावसायिक ठाण्यात परतल्यानंतर पुन्हा २० फेब्रुवारी रोजी दुपारी ते पाचपाखाडी येथील कार्यालयात असतांनाही त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आले. सुरुवातीला त्यांनी ते घेतले नाही. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना एक ऑडिओ क्लिप पाठविली. त्यातही त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने नौपाडा पोलिस ठाण्यात खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.