शिवसेना नगरसेविकेच्या पतीची जमीन तोतया इसम उभा करून विक्री प्रकरणी गुन्हा दाखल; केला २ कोटींचा व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:17 IST2022-03-18T18:15:11+5:302022-03-18T18:17:03+5:30
भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविकेच्या पतीची मुरबाड येथील शेत जमीन तोतया इसम उभा करून बनावट ओळखपत्रांच्या आधारे २ कोटी १८ लाखांचा खरेदी - विक्री व्यवहार नोंदणी करून सातबारा नोंदी फेरफार करून लाटण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे

शिवसेना नगरसेविकेच्या पतीची जमीन तोतया इसम उभा करून विक्री प्रकरणी गुन्हा दाखल; केला २ कोटींचा व्यवहार
मीरारोड -
भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविकेच्या पतीची मुरबाड येथील शेत जमीन तोतया इसम उभा करून बनावट ओळखपत्रांच्या आधारे २ कोटी १८ लाखांचा खरेदी - विक्री व्यवहार नोंदणी करून सातबारा नोंदी फेरफार करून लाटण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा न्यायालयातून जामीन मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
भाईंदर पूर्वेच्या शिवसेना नगरसेविका वंदना पाटील यांचे पती विकास रामचंद्र पाटील ( ६१) यांची मुरबाड तालुक्यातील पाटगाव येथे २००३ साली खरेदी केलेली सुमारे ४ हेक्टर ८३ आर शेत जमीन आहे . त्या ठिकाणी स्थानिक इसमास देखरेखीसाठी ठेवले आहे . डिसेम्बर २०२१ मध्ये सदर जमिनीच्या सातबाराची माहिती घेतली असता त्यांना धक्काच बसला . कारण त्यांनी स्वतः सदरची जमीन ७ डिसेम्बर २०२१ रोजी मुरबाड दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी द्वारे तुषार नीळकंठ मैद रा. संजीवनी इमारत, स्टेशन रोड, बदलापूर ह्याला २ कोटी १८ लाख रुपयांना विक्री केली आहे . आणि त्या दस्त नोंदणी आधारे तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाने फेरफार नोंद करून पाटील यांच्या मालकीची जागा तुषार मैद ह्याच्या नावे सातबारा वर नोंद केली आहे .
तुषार मैद ह्या इसमास ओळखत देखील नसताना जमिनीची परस्पर विक्री व सातबारा नोंदच्या गंभीर प्रकार बाबत पाटील यांनी तात्काळ जानेवारी महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयातून आणि तलाठी कार्यालयातून सर्व कागदपत्रे मिळवली . त्यात मालाडच्या आंबोजवाडी भागातील इसमास विकास पाटील म्हणून उभे केले व त्या इसमाचा फोटो वापरत बनावट सह्या केल्याचे आढळून आले . इतकेच नव्हे तर त्या तोतया इसमाचे पाटील यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड सदर नोंदणी व्यवहारात सादर करण्यात आले होते . नोंदणी वेळी साक्षीदार म्हणून कांदिवलीच्या हरिशकुमार प्रल्हाद अरोरा रा.प्रभुदास पांडीया, मनोहरनगर व बिपीन वसंत देशमुख, रा. डहाणूकर वाडी, शांतीनगर हे उपस्थित होते .
या प्रकरणी त्यांनी ४ जानेवारी रोजी मुरबाड पोलीस ठाणे निरीक्षक तर १४ फेब्रुवारी रोजी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना तक्रार अर्ज दिल्यावर २८ फेब्रुवारी रोजी मुरबाड पोलिसांनी तुषार मैद, तोतया विकास पाटील , हरीशकुमार अरोरा, व बिपीन देशमुख ह्या चौघा भामट्यांनी कट कारस्थान करून जमीन बळकावण्याचा प्रकार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यातील आरोपींची न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे.
गंभीर बाब म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय व तलाठी कार्यालयाने खऱ्या विकास पाटील यांची पूर्वीची खरेदी करारनामे , भाईंदरचा पत्ता , छायाचित्र उपलब्ध असताना देखील कोणतीच शहनिशा न करता दस्त नोंदणी व फेरवार करून सातबारा नोंद केली. या प्रकरणी ह्यात गुंतलेल्या सरकारी अधिकारी - कर्मचाऱ्यांना मात्र मोकाट सोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.