महावितरणच्या लाखो रुपयांच्या केबलवरच मारला डल्ला; मुंबई-अहमदाबाद रोडवर चोरी करणारे तिघे कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:40 IST2025-11-10T19:39:25+5:302025-11-10T19:40:22+5:30
भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले.

महावितरणच्या लाखो रुपयांच्या केबलवरच मारला डल्ला; मुंबई-अहमदाबाद रोडवर चोरी करणारे तिघे कोण?
नालासोपारा : महावितरणची ४३ लाख ७६ हजार रुपये किंमतीची केबल चोरणाऱ्या त्रिकुटाला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. आरोपींना रविवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महावितरण कंपनीच्या कामासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिवाचा पाडा येथे सर्व्हिस रोडवर ठेवलेले ४३ लाख ७६ हजार ७३६ रुपये किंमतीचे इलेक्ट्रिक केबल्सचे ४ ड्रम आणून ठेवले होते.
आरोपींनी चारही इलेक्ट्रिक केबलचे ड्रम १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान चोरी करून नेले. जय गणेश मनोहर प्रा.लि. कंपनीचे कंत्राटदार गोवर्धन भोईर यांनी शनिवारी तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवून सीसीटीव्ही तपासून, तांत्रिक विश्लेषण व बातमीदार यांचे मार्फतीने भिवंडी येथून अमजद उर्फ रहमत अली अलीम खान (वय ४३), इसाक गुलाम हुसेन खान (वय २७) आणि साजिद अब्दुल सत्तार मलिक (वय २५) या तिघांना शनिवारी रात्री ताब्यात घेतले.
आरोपींनी चौकशीमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन ताब्यात घेतले असल्याची माहिती पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी 'लोकमत'ला दिली.
आरोपींना १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी असून त्यांचे कोण साथीदार व चोरलेली केबल कुठे आहे याची चौकशी व तपास सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस नाईक परजणे, अनिल वाघमारे, निखिल घोरपडे, वसीम शेख यांनी केली.