मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोची शहरांतर्गत 9 स्थानके बांधण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:46 IST2017-12-04T19:44:44+5:302017-12-04T19:46:03+5:30
मीरा-भार्इंदर शहरात दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित असलेला मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहर मार्गे विस्तारीत करण्यात आला आहे.

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोची शहरांतर्गत 9 स्थानके बांधण्यात येणार
राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहरात दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित असलेला मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहर मार्गे विस्तारीत करण्यात आला आहे. त्याच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या शिष्टमंडळाने शहराला भेट दिली होती. त्यावेळी मेट्रो कारशेडसह नियोजित स्थानकांची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत नियोजित मेट्रोच्या शहरांतर्गत एकुण ९ स्थानकांचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
यात शहरांतर्गत असलेला राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वर २ मेट्रो स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यात दहिसर दिशेकडील पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल ठिकाणांचा समावेश आहे. भार्इंदर पुर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावर ५ स्थानके निश्चित करण्यात आली असुन त्यात काशिमिरा वाहतूक बेटालगतच्या झंकार कंपनी, मीरारोड परिसरातील साईबाबा नगर, दिपक हॉस्पिटल, तसेच या मार्गाचा छेदमार्ग असलेल्या गोल्डन नेस्ट रस्त्यावरील क्रिडा संकुल व इंद्रलोक ठिकाणांचा समावेश आहे.
भार्इंदर पश्चिमेकडे २ स्थानके प्रस्तावित करण्यात आली असुन त्यात मॅक्सस मॉल व नेताजी सुभाषचंद्र मैदान ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. नियोजित मेट्रो मार्ग काशिमिरा वाहतुक बेटाहुन छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग पुढे थेट भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान व पुर्वेकडील इंद्रलोकपर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. या नियोजित मेट्रो मार्गाच्या पाहणीकरीता एमएमआरडीए आयुक्त यु. पी. एस. मदान व अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी फेब्रुवारीमध्ये शहराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी नियोजित मेट्रो मार्गासाठी आवश्यक असलेल्या कारशेडसह मेट्रो स्थानकांच्या जागांची पाहणी केली होती. त्यावेळी पालिकेकडुन कारशेडसाठी चार जागा प्रस्तावित करण्यात आल्या. त्यात भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान परिसर, उड्डाणपुलालगतच्या दक्षिणेकडील जागा, पुर्वेकडील इंद्रलोक व घोडबंदर गावाकडील ट्रक टर्मिनल जागेचा समावेश आहे. या जागांच्या चाचपणीसह मेट्रो मार्गातील संभाव्य अडथळे व त्यावरील उपयांचा आढावा एमएमआरडीए आयुक्तांकडुन घेण्यात आला होता. त्यानुसार एमएमआरडीए प्रशासनाने निश्चित केलेल्या मेट्रो स्थानकांच्या नावांवर पालिका सभागृहात शिक्कामोर्तब करण्याची सुचना पालिकेला केल्याने त्याचा प्रस्ताव येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत सादर केला जाणार आहे. मेट्रो प्रकल्प टप्पा क्रमांक ७ मधील मार्ग दहिसर पर्यंत निश्चित करण्यात आल्यानंतर आ. प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिसरपर्यंतची मेट्रो मीरा-भार्इंदर शहरांतर्गत विस्तारीत करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले. त्याचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश देत प्रकल्पाच्या ६ हजार ५०० कोटी खर्चाच्या प्रस्तावाला त्यांनी २९ मार्चच्या एमएमआरडीए बैठकीत मान्यता दिली.