स्वस्त जागेच्या माेहामुळे गमावले ६४ लाख, ८ जणांची फसवणूक, कापूरबावडीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:25 IST2025-12-29T16:25:08+5:302025-12-29T16:25:38+5:30
या प्रकरणी इन्फोटेक कंपनीचे संचालक किसन राठोड याच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली.

स्वस्त जागेच्या माेहामुळे गमावले ६४ लाख, ८ जणांची फसवणूक, कापूरबावडीत गुन्हा दाखल
ठाणे : कमी किमतीमध्ये जागा देण्याच्या नावाखाली समीर साळवी यांच्यासह ८ जणांची ६४ लाख ५६ हजारांची फसवणूक झाली. या प्रकरणी इन्फोटेक कंपनीचे संचालक किसन राठोड याच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली.
समीर साळवी (२८) याला जागा खरेदीची करायची हाेती. जागेच्या शाेधात असताना सोशल मीडिया, काही वृत्तपत्रांमधील जाहिरात पाहून सप्टेंबर २०२३ मध्ये घोडबंदर रोड येथील इन्फ्राटेक कंपनीच्या ऑफिसमध्ये त्याने चौकशी केली. त्यावेळी सन राठोड, युगंधर, संतोष पावसकर, स्वप्नील भेगाळे, अविनाश नारकर आदींनी नवी मुंबई, पनवेल चर्नीरोड येथील प्लॉट चार लाखांना देण्याची बतावणी केली हाेती.
भिवंडीत दाखविली जागा -
भिवंडीतील काल्हेर येथील जागाही त्याला दाखविली. त्यासाठी त्यांनी एक लाखाचा चेक दिला. तीही जागा दिली नाही. जागेबाबत त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. साळवी याच्याप्रमाणेच प्रमोद राजभर यांच्याकडूनही दोन लाख अडीच हजार रुपये, संतोष शेवडे यांच्याकडून तीन लाख रुपये अशा आठ जणांकडून जागा मिळवून देण्याच्या नावाखाली राठोड यांच्या टोळीने ६४ लाख ५६ हजारांची रक्कम १९ सप्टेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२५ या दरम्यान लुबाडली.