आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 12:30 AM2019-06-08T00:30:00+5:302019-06-08T00:30:43+5:30

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न

600 volunteers in the field to cover the buses; | आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

Next

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखणार, अशी शक्यता वाटत होती. मात्र, भाजपनेच आव्हाडांना घेरण्यासाठी गनिमी कावा सुरू केला आहे. काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे ६०० हून अधिक स्वयंसेवक कळवा, मुंब्रा पिंजून काढत असून स्थानिकांसोबत गुप्त बैठका घेण्यावरही त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजप दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ६७ हजार ४५५ मते मिळाली. शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना या मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली. परंतु, विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. येत्या विधानसभा निवडणुकीत आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेकडून मागील निवडणुकीप्रमाणे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु, संघ परिवार व भाजप नेतृत्वावर टीकेचे प्रहार करणाऱ्या आव्हाडांना त्यांच्याच घरात घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची माहिती आहे. रा.स्व. संघ, भाजपविरोधात कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंह, हार्दिक पटेल यांनी मोर्चा उघडला होता. परंतु, त्या सर्वांचे आवाज भाजपने लोकसभा निवडणुकीत बंद करून टाकले. राज्यातील इतर कोणताही नेता हिंदुत्वाविरोधात थेट आवाज उठवत नाही, परंतु आव्हाड हे नेहमी भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात बोलत असल्याने आता त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने उचल खाल्ली आहे.
भाजप आणि स्वयंसेवक संघाची मंडळी या भागात गुप्त बैठका घेत असून आव्हाड यांचे कच्चे दुवे हेरत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला १२ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे आता शिवसेनेला हाताशी घेऊन या मतदारसंघावर कब्जा करण्याची भाजपची तयारी आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. एमआयएमचा उमेदवार उभा करून मुस्लिम मतांचे विभाजन करणे शक्य आहे का, याचा आढावा स्वयंसेवक घेत आहेत. परंतु, शिवसेना हा मतदारसंघ सोडेल का, याबाबत चित्र स्पष्ट नाही. प्रस्ताव आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: 600 volunteers in the field to cover the buses;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.