ठाण्यात ३५५ ड्रग्ज तस्कर अटकेत; रेव्ह पार्ट्यांनाही दणका
By जितेंद्र कालेकर | Updated: April 16, 2026 12:59 IST2026-04-16T12:58:31+5:302026-04-16T12:59:01+5:30
Thane Crime News: पोलिसांनीही गेल्या वर्षभरात ८० कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केले असून, तस्करी करणाऱ्या ३५५ आराेपींना अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलशेतच्या खाडीकिनारी रंगलेल्या एका रेव्ह पार्टीवरही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली.

ठाण्यात ३५५ ड्रग्ज तस्कर अटकेत; रेव्ह पार्ट्यांनाही दणका
- जितेंद्र कालेकर
ठाणे - पोलिसांनीही गेल्या वर्षभरात ८० कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केले असून, तस्करी करणाऱ्या ३५५ आराेपींना अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलशेतच्या खाडीकिनारी रंगलेल्या एका रेव्ह पार्टीवरही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. यावेळी ९० पुरुष व पाच तरुणींना मद्यधुंद अवस्थेत सापडले. याशिवाय, वर्षभरात अमलीपदार्थाचे सेवन करणाऱ्या २ हजार ६६९ जणांना अटक झाली.
मोक्कानुसार अशा ड्रग्ज तस्करांवर ठाणे पोलिसांकडून कडक कारवाई होत असली तरी अजूनही टिकूजिनीवाडी, येऊर आणि रेल्वेस्थानकसारख्या परिसरात नशेबाजांकडून गांजा, चरस आणि एमडी सेवनाचे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात अशी झाली कारवाई
कासारवडवली खाडीकिनारी दोघांनी रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने ३१ डिसेंबर २०२३ राेजी छापा टाकला. तिथे ९० पुरुष व पाच तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळले. इव्हेंट आयोजक दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७० ग्रॅम चरससह एलएसडी, एस्केटसी पिल्स, गांजा असा आठ लाखांचा साठा पकडला होता.
ड्रग्ज तस्करीचे आंतरराज्य रॅकेट उघड
मेफेड्राॅन (एमडी) या अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा मुंब्रा पाेलिसांनीही पर्दाफाश केला. यामध्ये बासू सय्यद याच्यासह पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून २७ काेटी २१ लाख ७७ हजार ७५० रुपयांचा तब्बल १३ किलाे ६२९ ग्रॅम एमडी हस्तगत झाले. ही कारवाई ११ जानेवारी २०२६ राेजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. चौकशीत मध्य प्रदेशातून मुंब्रा-ठाण्यात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या रामसिंग गुज्जर (४०) आणि कैलास बलई (३६) या आणखी दोघांना अटक झाली.
ठाण्यात तस्करीतील तिघांकडून ४ काेटींचे ‘एमडी’ जप्त
एमडीची तस्करी करणाऱ्या साेहेल खान (२६, रा. काेपरी, ठाणे) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थ विराेधी पथकाने २३ मार्च २०२६ राेजी अटक केली. पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन साेनवणे यांच्या पथकाने कारवाई करीत त्यांच्याकडून चार काेटी १२ लाखांचे दाेन किलाे ६२ ग्राम एमडी हस्तगत केले.
वर्षभरात ठाण्यातून तब्बल ८० काेटींचे ड्रग्ज हस्तगत
जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात ठाणे पाेलिसांनी १,४२९ किलाे गांजा, सात किलाे हायब्रिड गांजा, १३० ग्रॅम हायड्रा गांजा, ३० किलाे एमडी, एक किलाेचे काेकीन, ३३४ बाटल्या सोल्युशन आणि २३ हजार २०८ कफ सिरप बाॅटल्स असे सुमारे ८० काेटींचे ड्रग्ज जप्त केले. यात ३५५ आराेपींना अटक झाली.
कारवाईनंतरही होते ‘दम माराे दम ’
पाेलिसांकडून वारंवार कारवाई हाेऊनही मुंब्रा, कळवा, येऊर, रेल्वेस्थानक आणि टिकूजिनीवाडी परिसरात अजूनही काही ठिकाणी नशेबाजांकडून छुप्या पद्धतीने अमलीपदार्थांचे सेवन आणि तस्करी हाेते. यावरही आणखी तीव्र कारवाईची माेहीम उघडण्याची मागणी जाेर धरू लागली आहे.