मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:25 IST2025-08-25T15:24:41+5:302025-08-25T15:25:27+5:30
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
ठाणे - येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची रांग लागली आहे. त्यात कल्याण डोंबिवली येथे मनसेला धक्का देण्याचं काम शिंदेसेनेकडून सुरू आहे. कल्याणचे लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे २ माजी नगरसेवक शिंदेसेनेत दाखल झाले आहे.
केडीएमसी क्षेत्रातील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामे झाली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एमएमआर परिसरात विकासाला चालना दिली. या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
📍 ठाणे |#कल्याण#डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या पत्नी सौ.ज्योती राजन मराठे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसोबत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.… pic.twitter.com/JHgf9fbuvT
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 25, 2025
शिंदेसेनेत या नेत्यांनी केला प्रवेश
दरम्यान, आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे, उपशहर अध्यक्ष किशोर कोशिंबकर, सुरेश मराठे, रविंद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबजी पाटील, आकाश पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.