आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:55 IST2018-08-25T00:51:46+5:302018-08-25T00:55:09+5:30
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत जवळपास ३०० अपघातांची नोंद झाली आहे.

आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू
ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत जवळपास ३०० अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये १६० जणांचा मृत्यू झाला असून ११८ जण जखमी झाले आहेत. यात लोकलमधून पडल्याच्या सुमारे १०० घटनांचा समावेश असून त्यात ७७ जण जखमी झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द कोपरी पुलापासून दिवा रेल्वेस्थानक ते दिव्यापासून निळजेपर्यंत अशी पसरली आहे. ठाण्यातून रेल्वेने दररोज सातआठ लाख प्रवासी येजा करतात. तसेच सकाळी आणि सायंकाळी अक्षरश: लोकलला असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना हे अपघात होताना प्रामुख्याने दिसून येत आहे.
जानेवारी ते २३ आॅगस्ट या आठ महिन्यांत रेल्वे अपघातांत १६० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झाला आहे. तर, १७ जणांचा लोकल प्रवासादरम्यान पडून आणि एकाचा खांब लागल्याने तसेच दोघे गॅपमध्ये पडून दगावले आहेत. तसेच ११८ जण रेल्वे अपघातांत जखमी झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ७७ जण लोकल प्रवासादरम्यान पडल्याने जखमी झाले आहेत. तर, २७ जण रेल्वेची धडक लागल्याने जखमी झाले आहेत. या अपघातांतील १९ मयतांच्या वारसांचा शोध लागला नसल्याने ते अद्यापही बेवारस असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.