शहरातील १५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:18+5:302021-07-29T04:40:18+5:30

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरूच असून, ...

15 unauthorized constructions in the city | शहरातील १५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

शहरातील १५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

Next

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरूच असून, बुधवारी विविध ठिकाणांची १५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

या कारवाईअंतर्गत माजिवडा - मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाघबीळ गाव येथे पाच मजली, ४८ खोल्यांच्या अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून, या इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यांचे स्लॅब तोडण्यात आले. कावेसर वाघबीळ येथील स्वस्तिक रेगालिया बिल्डिंगमागे असलेले पाच अनधिकृत आरसीसी गाळ्यांचे बांधकाम व एक अनधिकृत इमारतीच्या फुटिंगचे बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. बाळकुम पाडा नं. १ येथील सहा मजली अनधिकृत इमारतीवरसुद्धा निष्कासनाची कारवाई सुरू केली असून, लोढा स्प्लेंडोरा येथील दोन गाळ्यांच्या फाउण्डेशनचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील खारेगाव येथील सहा मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाव्या मजल्याचे दहा स्लॅब इलेक्ट्रिक ब्रेकर व गॅस कटरने तोडून आठ कॉलम तोडण्यात आले. पाचपाखाडी नाका येथे सात मजली अनधिकृत इमारतीमधील चौथ्या, पाचव्या व सहाव्या मजल्यावरील एकूण सहा रूमचे अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले.

दिवा प्रभाग समितींतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील बांधकामधारक अजीम मुकरी यांच्या तीन मजले व्याप्त असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील वाढीव बांधकाम व तीन स्लॅब तोडण्यात आले. वर्तकनगर प्रभाग समितीममधील हँगआउट हुक्का पार्लर आणि साई सम्राट लॉजचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.

ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उपआयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निष्कासनचे सहाय्यक आयुक्त फारूख शेख, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, प्रणाली घोंगे, अलका खैरे आणि सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या मदतीने केली.

Web Title: 15 unauthorized constructions in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.