मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:29 IST2025-11-26T17:28:43+5:302025-11-26T17:29:07+5:30
स्मार्टफोन आणि क्रोमबुकच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर आता गूगल पारंपरिक पीसी मार्केटमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.

मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
कॉम्प्युटर बाजारात सर्वेसर्वा असणाऱ्या मायक्रोसॉफ्टला स्मार्टफोन बाजारात जंग जंग पछाडले तरी काही पाय रोवता आले नव्हते. मायक्रोसॉफ्टची विंडोज ओएस फेल गेली. कंपनीने जगातील तेव्हाची सर्वात मोठी कंपनी नोकियाला देखील खरेदी करून पाहिले, परंतू काही केल्या स्मार्टफोनचा ऑपरेटिंग सिस्टीमचा बाजार मायक्रोसॉफ्टला जमला नाही. गुगलच्या अँड्रॉईडने आणि अॅपलच्या आयओएसने साधे पाऊलही ठेवू दिलेले नाही. अशातच आता मायक्रोसॉफ्टला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात टक्कर देण्यासाठी गुगलने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.
स्मार्टफोन आणि क्रोमबुकच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर आता गूगल पारंपरिक पीसी मार्केटमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. गूगल लवकरच 'अॅल्युमिनियम OS' नावाचा एक नवा आणि महत्त्वाकांक्षी Android-आधारित ऑपरेटिंग सिस्टम लाँच करण्याची शक्यता आहे. जी खास लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी डिझाइन केली जात आहे.
मायक्रोसॉफ्टच्या 'विंडोज' आणि ॲपलच्या 'मॅकओएस' या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम्सला थेट आव्हान देण्यासाठी गूगलने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. हे नवे OS, Android च्या क्षमतेचा वापर पीसीसाठी करेल. ज्यामुळे डेस्कटॉपवर Android ॲप्स अधिक चांगल्या प्रकारे वापरता येणार आहेत.
तसेच या अॅल्युमिनियम OS मध्ये गूगलच्या शक्तिशाली जेमिनी AI साधनांचे एकत्रीकरण असणार आहे. बॅटरी आणि मेमरी मर्यादांची अडचण येणार नसल्याने सध्या प्रीमियम Android फोन्समध्ये वापरले जाणारे AI फीचर्स PC प्लॅटफॉर्मवर अधिक वेगवान आणि शक्तिशाली बनणार आहेत. गूगलने अलीकडेच LinkedIn वर या प्रकल्पासाठी 'सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर' पदासाठी भरती जाहीर केली होती. या जॉब लिस्टिंगमधूनच 'अॅल्युमिनियम OS' नावाच्या या नवीन, AI-केंद्रीत प्लॅटफॉर्मचे संकेत मिळाले आहेत.