व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनो सावधान! 'हे' फिचर ठरू शकतं धोक्याचं; एका चुकीमुळे बँक खातं होईल रिकामं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 16:44 IST2026-01-04T16:39:48+5:302026-01-04T16:44:03+5:30
व्हॉट्सॲपवरील एका साध्या वाटणाऱ्या सुविधेचा गैरवापर करून तुमचे बँक खाते क्षणार्धात रिकामे केले जाऊ शकते आणि तुम्हाला याची भनकही लागणार नाही.

व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनो सावधान! 'हे' फिचर ठरू शकतं धोक्याचं; एका चुकीमुळे बँक खातं होईल रिकामं
आजच्या काळात व्हॉट्सॲप हे केवळ चॅटिंगचे माध्यम राहिले नसून ते पेमेंट, कॉलिंग आणि अकाउंट व्हेरिफिकेशनचा महत्त्वाचा भाग बनले आहे. मात्र, याच सोयीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारत आहेत. व्हॉट्सॲपवरील एका साध्या वाटणाऱ्या सुविधेचा गैरवापर करून तुमचे बँक खाते क्षणार्धात रिकामे केले जाऊ शकते आणि तुम्हाला याची भनकही लागणार नाही.
कसा होतो 'कॉल फॉरवर्डिंग'चा वापर?
या फसवणुकीची सुरुवात एका साध्या फोन कॉल किंवा मेसेजने होते. ठग स्वतःला बँक कर्मचारी, डिलिव्हरी एजंट किंवा एखाद्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवतात. तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये काही तांत्रिक अडचण असल्याचे किंवा तुमचे पार्सल अडकल्याचे सांगून ते तुम्हाला विश्वासात घेतात. त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या फोनवर एक विशिष्ट 'कोड' डायल करायला सांगतात.
जसा तुम्ही तो कोड डायल करता, तशी तुमच्या फोनची 'कॉल फॉरवर्डिंग' सुविधा सुरू होते. यामुळे तुमच्या फोनवर येणारे सर्व कॉल्स आपोआप त्या ठगाच्या नंबरवर ट्रान्सफर होतात.
ओटीपीशिवाय मारला जातो डल्ला
एकदा का तुमचे कॉल्स फॉरवर्ड झाले की, सायबर गुन्हेगारांचे काम सोपे होते. बँक व्यवहारांसाठी किंवा व्हॉट्सॲप लॉगिनसाठी लागणारा 'ओटीपी' अनेकदा कॉलच्या माध्यमातून मिळवता येतो. तुमच्या मोबाईलवर कॉल येण्याऐवजी तो थेट गुन्हेगाराला जातो. या माहितीच्या आधारे ते तुमच्या बँकेचे यूपीआय किंवा व्हॉट्सॲप खाते स्वतःच्या फोनमध्ये सुरू करतात आणि तुमची आयुष्यभराची कमाई लुटतात.
का होत नाही लवकर जाणीव?
या फ्रॉडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पीडित व्यक्तीला लगेच काहीच समजत नाही. फोनवर कॉल येणे बंद झाल्यावर लोक त्याला 'नेटवर्कची समस्या' समजून दुर्लक्ष करतात. जोपर्यंत बँकेतून पैसे कट झाल्याचा मेसेज येतो, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. तसेच, तुमचे व्हॉट्सॲप खाते हॅक करून तुमच्या ओळखीच्या लोकांकडूनही पैशांची मागणी केली जाऊ शकते.
सुरक्षित राहण्यासाठी 'या' ५ टिप्स फॉलो करा:
अनोळखी कोड टाळा: कोणत्याही अनोळखी व्यक्तीने सांगितलेला कोणताही कोड (उदा. ४०१ वगैरे) फोनवर डायल करू नका.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन: तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये 'Two-step verification' त्वरित ऑन करा. यामुळे तुमचे खाते अधिक सुरक्षित होईल.
नेटवर्क चेक करा: जर अचानक फोनवर कॉल येणे बंद झाले, तर तातडीने सिम कार्डची स्थिती आणि कॉल फॉरवर्डिंग सेटिंग्स तपासा.
बँकेशी संपर्क साधा: कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसताच आपले बँक खाते ब्लॉक करा.
अधिकृत चॅनेलचा वापर: बँक किंवा व्हॉट्सॲप कधीही फोनवर तुमची वैयक्तिक माहिती किंवा कोड मागत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.
तुमची सतर्कता हाच या सायबर धोक्यांपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. ही माहिती तुमच्या मित्र-परिवाराला नक्की शेअर करा.