जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप WhatsApp वर एक गंभीर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये हॅकर्सनी कोणत्याही लिंकवर क्लिक करायला न लावता किंवा मेसेजला प्रतिसाद न देता थेट युजर्सचे डिव्हाइस हॅक केले. या प्रकारच्या हल्ल्याला 'झीरो-क्लिक अटॅक' (Zero-Click Attack) म्हणतात.
व्हॉट्सॲप आणि ॲप्पलच्या सिस्टीममधील दोन मोठ्या त्रुटींमुळे हा हल्ला शक्य झाला. व्हॉट्सॲपमधील एका त्रुटीमुळे हॅकर्सनी युजरच्या डिव्हाइसवर कोणत्याही प्रकारचा डेटा पाठवला. दुसरीकडे, ॲप्पलच्या iOS आणि macOS या ऑपरेटिंग सिस्टीममधील त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्सने निवडक युजर्सना लक्ष्य केले.
२०० पेक्षा कमी युजर्स झालेत शिकारकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सायबर हल्ल्यात जगभरात २०० पेक्षा कमी युजर्सना लक्ष्य करण्यात आले आहे. पण, यामध्ये पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि संवेदनशील कामांशी संबंधित लोकांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा हल्ला अत्यंत गंभीर आणि नियोजित मानला जात आहे.
व्हॉट्सॲपने तातडीने या त्रुटी दूर केल्या असून, प्रभावित झालेल्या युजर्सना ॲपमध्ये नोटिफिकेशन पाठवून धोक्याची सूचना दिली आहे. ॲप्पलने देखील आपल्या सिस्टीमसाठी नवीन अपडेट्स जारी केले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा हल्ल्यांपासून बचाव करता येईल.
तुम्ही तुमच्या फोनला कसं सुरक्षित ठेवाल?सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत:
> तुमचा आयफोन आणि मॅक लगेच लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा.
> व्हॉट्सॲपचे नवीन व्हर्जन इन्स्टॉल करणे खूप महत्त्वाचे आहे.
> जर तुम्ही पत्रकार किंवा संवेदनशील क्षेत्रात काम करत असाल, तर तुमच्या डिव्हाइसवरील 'लॉकडाउन मोड'सारख्या फीचर्सचा वापर करा.
> कोणत्याही अनोळखी लिंक किंवा ॲपपासून सावध राहा.
हा हल्ला जरी निवडक युजर्सवर झाला असला, तरी भविष्यात असे धोके टाळण्यासाठी आपल्या फोन आणि ॲप्सची सुरक्षा नेहमीच अपडेटेड ठेवणे आवश्यक आहे.