‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअॅपला ठाऊक...’, इलॉन मस्क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:40 IST2025-11-01T16:38:55+5:302025-11-01T16:40:48+5:30
.. याच वेळी त्यांनी स्वतःचे नवे मेसेजिंग अॅप ‘X Chat’ आणण्याची घोषणा केली.

‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअॅपला ठाऊक...’, इलॉन मस्क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
टेस्ला तथा स्टारलिंकचे मालक एलन मस्क यांनी पुन्हा एकदा डिजिटल जगतात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपवर गंभीर आरोप केले आहेत. या अॅपला युजर काय मेसेज करत आहेत, हे माहिती असते आणि त्यावरूनच त्यांना जाहिराती दाखवल्या जातात. सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी तृटी आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी स्वतःचे नवे मेसेजिंग अॅप ‘X Chat’ आणण्याची घोषणा केली. वॉट्सअॅपला टक्कर देणारे हे अॅप पुढील काही महिन्यांत लाँच होणार असून ते मस्क यांच्या ‘X’ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी इंटीग्रेट केले जाईल.
मस्क म्हणाले, ‘X Chat’ अॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येईल. ते बिटकॉइनप्रमाणे पीअर-टू-पीअर सिस्टमवर आधारित असेल. ‘जो रोगन पॉडकास्ट’मध्ये त्यांनी दावा केला की, हे अॅप पूर्णपणे सुरक्षित असेल, त्यात जाहिराती नसतील आणि वापरकर्त्यांचे चॅट्स गोपनीय राहतील. तसेच ‘X Chat’ कोणत्याही थर्ड पार्टी सेवेशी जोडलेले नसेल, यामुळे वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहील.
या अॅपबाबत मस्क यांनी दावा केला की ते “झिरो जाहिराती, झिरो डेटा प्रूफिंग आणि झिरो कॉम्प्रोमाइज” या तत्त्वांवर कार्य करेल. यात वापरकर्ते डायरेक्ट मेसेज, फाइल शेअरिंग तसेच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही करू शकतील.
खरेतर, मस्क यांनी वॉट्सअॅपवरील आरोपांसंदर्भात अद्याप कोणताही पुरावा दिलेला नाही. वॉट्सअॅपने नेहमीच आपल्या मेसेजिंग सेवेच्या सुरक्षिततेचा दावा केला आहे. यामुळे मस्क यांच्या या वक्तव्याकडे ‘X Chat’च्या प्रमोशनचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे.
यापूर्वी मस्क यांनी विकिपीडियावरही आरोप केले होते आणि त्याला उत्तर म्हणून ‘ग्रोकीपिडिया’ नावाचे अॅप सादर केले होते. आता ते ‘X Chat’च्या माध्यमाने आणखी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणण्याच्या तयारीत आहेत.