शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये आहे. मात्र मोदी सरकारने चीनला मोठा दणका देत लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं सांगत अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर अ‍ॅपल आणि गुगलनेही TikTok ला दणका देत मोठा निर्णय घेतला. भारतामध्ये TikTok गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे. भारतानंतर अनेक देशही टिकटॉकवर बंदी घालण्याच्या विचारात आहेत. यामुळे टिकटॉकला आपले लाखो युजर्स गमावावे लागू शकतात. टिकटॉक अ‍ॅपवर युजर्सचा डेटा परवानगी शिवाय परदेशात पाठवण्याचा आणि बाहेरील सर्व्हरमध्ये स्टोर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. डेटा संबंधीत तक्रारीनंतर साऊथ कोरियासह अनेक देशात या अ‍ॅपवर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. चीनशी संबंधीत असल्याने या अ‍ॅपला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.  

टिकटॉकची पॅरंट कंपनी ByteDance चीनशी संबंधीत आहे. भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर अमेरिकेतील युजरबेस गमावण्याची भीती कंपनीला सतावत होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिनी अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. The New York Times च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत बंदीपासून वाचवण्यासाठी टिकटॉक हे अ‍ॅप विकलं जाण्याची शक्यता आहे. टिकटॉकला मायक्रोसॉफ्ट कंपनीने खरेदी करावं असं व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिसला वाटत आहे. त्यासाठी कंपनी त्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. मात्र जगभरातील अनेक देशांमध्ये ते अद्यापही सुरू आहे. टिकटॉकने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. टिकटॉक हे मनोरंजनाचं उत्तम माध्यम असून या अ‍ॅपच्या मदतीने कोणीही सहजतेने व्हिडीओ तयार करू शकतं. त्याचं हेच वेगळेपण सर्वांना आकर्षित करतं. TikTok बद्दलच्या अशाच काही खास गोष्टी जाणून घेऊया.

टिकटॉक हे 155 देशांमध्ये आणि 75 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 90 टक्के युजर्स दररोज या अ‍ॅपचा वापर करतात. वर्षभरात दररोज सरासरी एक मिलियनहून अधिक व्हिडिओ पाहिले गेले. 2019 मध्ये पाच देशांत टिकटॉक सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलं आहे. यामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 190.6 मिलियन वेळा डाऊनलोड करण्यात आलं असून अमेरिकेसह इतरही काही देशांचा समावेश आहे. अमेरिकत 41.0, तुर्की 23.2, रशिया 19.9, पाकिस्तानमध्ये 19.5 मिलियन वेळा टिकटॉक डाऊनलोड करण्यात आलं आहे. भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली असली तरी अद्याप बऱ्याच देशात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून कोट्यवधी युजर्स आहेत. 

TikTok हे एक iOS आणि Android मीडिया अ‍ॅप सप्टेंबर 2016 रोजी चीनमध्ये सुरू करण्यात आलं. त्यानंतर ByteDance ने 2017 मध्ये हे अ‍ॅप चीनच्या बाहेर लाँच केलं. जगभरात त्यानंतर ते उपलब्ध करण्यात आलं. लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील हुशारीला प्रोत्साहन देणं हा कंपनीचा यामागील उद्देश आहे. तसेच युजर्सना छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त होण्याची, अवघ्या काही मिनिटांत लोकप्रिय होण्याची  यामधून संधी मिळते. यासोबतच टिकटॉकने युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या दिग्गजांशी देखील स्पर्धा केली आहे. 

जगभरात तब्बल 800 मिलियन युजर्स आहेत. लिंक्डइन, ट्विटर, पिनटेरेस्ट आणि स्नॅपचॅट सारख्या प्रसिद्ध साईट्सप्रमाणेच किंबहुना थोडं जास्तच यश टिकटॉकने मिळवलं आहे. विशेष म्हणजे टिकटॉकचे दिवसाला 150 मिलियन युजर्स आहे. मात्र यातील अधिकतर युजर्स हे चीनमधील आहेत. कंबोडिया, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या बर्‍याच आशियाई देशांनी खासकरुन टिकटॉकचं उत्साहाने स्वागत केलं होतं. मात्र आता काही देशांनी त्यावर बंदी घातली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत इन्स्टाग्राम फेसबुकला जे जमलं नाही ते टिकटॉकने करून दाखवलं. 

जगभरात टिकटॉक Apple App Store आणि Google Play वरून तब्बल 2 बिलियनवेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. 2019 मध्ये एक बिलियन डाऊनलोड होतं. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत अ‍ॅपने दोन बिलियनचा टप्पा गाठला. 2020 च्या पहिल्या तीन महिन्यांत जगभरात एकूण 315 मिलियनवेळा टिकटॉक डाऊनलोड करण्यात आलं. त्यांच्या मागील तिमाहीच्या तुलनेत ही वाढ 58 टक्क्यांनी अधिक झाली. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळेच या दरम्यान फोनचा वापर सर्वाधिक केला जात असल्याने ही वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. 

Apple’s iOS App वर टिकटॉक हे सर्वाधिक वेळा डाऊनलोड केलं गेलं असून तब्बल 33 मिलियनवेळा ते डाऊनलोड करण्यात आलं. तसेच हे अ‍ॅप वापरणारे असंख्य युजर्स आहेत. मात्र जवळपास 41 टक्के युजर्स हे 16 ते 24 वयोगटादरम्यान आहेत. टिकटॉक भारतात 611 मिलियन वेळा डाऊनलोड केलं गेलं, जे जगभरात डाऊनलोड केलेल्याच्या सुमारे 30 टक्के आहे. अनेक युजर्स दिवसातील बराचसा वेळ हा टिकटॉकवर घालवतात. दररोज युजर्र अ‍ॅपवर जवळपास 52 मिनिटे खर्च करत असल्याची माहिती मिळत आहे. 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अमेरिकेत युजर्सची संख्या 5.5 पटीने वाढली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: TikTok Statistics That You Need to Know in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.