Tesla Humanoid Robot: जाम भारी! इलॉन मस्कने लॉन्च केला पहिला ह्यूमनॉइड रोबोट, माणसांप्रमाणे सर्व कामे करणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 14:37 IST2022-10-02T14:21:33+5:302022-10-02T14:37:49+5:30
Optimus Robot: चित्रपटांमध्ये रोबोट माणसांप्रमाणे कामे करताना दाखवतात, ती गोष्ट आता प्रत्यक्षात उतरली आहे.

Tesla Humanoid Robot: जाम भारी! इलॉन मस्कने लॉन्च केला पहिला ह्यूमनॉइड रोबोट, माणसांप्रमाणे सर्व कामे करणार...
Elon Musk : तुम्ही रजनीकांत यांचा 'रोबोट' किंवा हॉलिवूड अभिनेता विल स्मिथचा 'आय रोबोट' चित्रपट पाहिला असेल. त्या चित्रपटात रोबोट माणसांप्रमाणे सर्व कामे करताना दाखवण्यात आला आहे. आता ती संकल्पना प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क (Tesla Elon Musk) यांनीही किमया करुन दाखवली आहे.
ह्युमनॉइड रोबोट लॉन्च
इलॉन मस्क हे फक्त जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जात नाहीत, तर नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीही त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेकदा प्रगत असे तंत्रज्ञान तयार केले आहे. त्यांची टेस्ला ऑटो पायलट कार, लोकांना मंगळावर नेण्याचा प्रकल्प, याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. यातच आता शुक्रवारी, मस्क यांनी एका एआय (Ai) इव्हेंटमध्ये ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमस (Humanoid Robot Optimus) लॉन्च केला आहे.
रोबोट माणसांप्रमाणेच काम करतो
या रोबोटच्या अनेक फीचर्सने जगाला चकित केले आहे. हा रोबोट उद्योग कार उद्योगापेक्षा अधिक यशस्वी होईल, असा मस्क यांना विश्वास आहे. इव्हेंटमध्ये या रोबोटचा प्रोटोटाइप स्टेजवर उतरवण्यासोबतच, त्याचा एक व्हिडिओही दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये हा रोबोट बॉक्स उचलताना, झाडांना पाणी देताना आणि माणसांसारखी कामे करताना दिसत आहे.
— Tesla (@Tesla) October 1, 2022
पुढील वर्षीपासून उत्पादन सुरू होऊ शकते
या कार्यक्रमात मस्क यांनी सांगितले की, शक्य तितक्या लवकर याला आणखी प्रगत ह्युमनॉइड रोबोट बनवण्याचा आमचा उद्देश आहे. रोबोटसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा लवकरच येणार आहे. हा रोबोट अनपेक्षित परिस्थिती हाताळू शकतो की नाही, याची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे, असेही ते म्हणाले. मस्क यांनी ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या AI इव्हेंटमध्येच टेस्लाच्या या रोबोटची घोषणा केली होती. सूत्रांनुसार, 2023 पासून त्याचे उत्पादन सुरू होऊ शकते.
हे काम देखील करू शकता
इलॉन मस्क म्हणतात की, सुरुवातीला ऑप्टिमसचा वापर कंटाळवाण्या आणि धोकादायक कामांसाठी केला जाईल. तो टेस्लाच्या कारखान्यांमध्ये वस्तू इकडून-तिकडे फिरवताना दिसेल. तसेच, कार उत्पादनादरम्यान तो बोल्ट घट्ट करेल. ह्युमनॉइड रोबोट फर्म अॅजिलिटी रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोनाथन हर्स्ट यांनी रॉयटर्सला सांगितले की, हा रोबोट भविष्यात मानवाच्या अनेक गोष्टी करू शकतो.