Technology: मेंदूला घेरतोय BRAIN ROT! तासनतास रील बघणाऱ्यांनो, आता तरी जागे व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:50 IST2024-12-05T16:50:14+5:302024-12-05T16:50:52+5:30
Technology: रील बघायला सुरुवात झाली की एकामागोमाग एक रील बघितले जातात आणि मेंदू सडण्याची प्रक्रिया वेगाने होते; जाणून घ्या ब्रेन रॉट विषयी...

Technology: मेंदूला घेरतोय BRAIN ROT! तासनतास रील बघणाऱ्यांनो, आता तरी जागे व्हा!
पूर्वी गप्पांमध्ये, मालिकांमध्ये, खेळण्यामध्ये, वाचनामध्ये तासनतास कधी निघून जायचे कळायचेही नाही. आज याच सगळ्या गोष्टींची जागा एकट्या मोबाईलने घेतली आहे. ज्यात वेळ तेवढाच खर्च होतोय, पण शरीराला, मेंदूला श्रम शून्य आणि थकवा भरमसाठ येतो! शिवाय शारीरिक, मानसिक आजार हातात हात घालून येतात ते वेगळे! मेंदूवर ताबा घेणाऱ्या या निष्फळ प्रक्रियेला 'ब्रेन रॉट' म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर अनावश्यक माहितीचा मेंदूवर सातत्याने होणारा आघात!
ब्रेन रॉट हा शब्द तसा जुनाच आहे, पण सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मेंदूला गंज चढण्याची जी प्रक्रिया सुरु झाली, त्यामुळे हा शब्द पुनर्वापरात येऊ लागला आहे. ज्याप्रमाणे कोरोना काळात लॉकडाऊन शब्द प्रचलित झाला, तसा येत्या काळात ब्रेन रॉट हा शब्द परवलीचा होणार आहे.
'जो मोबाईलचा असतो, तो कोणाचा नसतो' असे उपरोधिक विधान केले जाते. दुर्दैवाने हे ८० टक्के लोकांना लागू होते. संपर्कांसाठी सोयीचे माध्यम असणारा मोबाईल सोशल मीडिया आल्यापासून मनोरंजनाचे साधन बनला. लोक लोकांपासून दुरावले. एकट्या माणसाचा वेळही मजेत जाऊ लागला. सोबतीची निकड दूर झाली. सगळ्यांच्या माना मोबाईलसमोर झुकल्या. पूर्वी दोन अनोळखी लोक प्रवासात नाव न विचारताही गावभरच्या गप्पा मारत सुखेनैव प्रवास करत जायचे. आता प्रवासात सोडा, पण घरातले सदस्यही एकमेकांशी बोलत नाहीत तर कौटुंबिक ग्रुपवर टाईप करून निरोप पोहोचवतात. बोलणे तर खुंटले आहेच पण चांगले वाचन, चांगले माहितीपर व्हिडीओ पाहणेही कमी झाले आहे.
निरीक्षण केल्यास लक्षात येईल, की पूर्वी एकच चित्रपट कितीही वेळा लागला तरी तो पाहण्याची लोकांची तयारी असे. आता 'वन टाइम वॉच' मुव्ही अर्थात एकदाच पाहण्यासारखा चित्रपट असे लेबल लावून मोकळे होतात. पूर्वी मालिकांमध्ये उद्या काय होणार याची उत्सुकता असे, आता वेबसिरीजचे सगळे एपिसोड पाहून झाल्यावरच फोन खाली ठेवला जातो. त्यासाठी रात्रभर जागरण करण्याचीही तयारी असते. इंटरनेटवर अनेक माहितीपर व्हिडीओ असूनही ते पाहण्याइतका लोकांचा संयम राहिलेला नाही. एखादी रेसेपी सुद्धा फॉरवर्ड करत बघितली जाते किंवा झटपट रील बघून समजून घेतली जाते.
अनेकदा काय पाहण्यासाठी फोन हातात घेतला आणि काय बघत बसलो याचा ताळमेळ राहत नाही. जे काही पाहिले ते लक्षातही राहत नाही. पाहिलेल्या व्हिडीओचा उपयोगही होत नाही. अशा वेळी मेंदूवर आदळणारी माहिती 'ब्रेन रॉट' म्हणून संबोधली जाते. जी पाहून माहितीत भर पडत नाहीच, पण डोळ्यांना थकवा जाणवतो. हात, खांदे आखडतात. डोकं जड होते. नवीन काही करण्याचा उत्साह राहत नाही.
सोशल मीडियावर लोकांनी घड्याळ बाजूला ठेवून वेळ घालवावा, अशीच त्याची रचना केली आहे. ज्यामुळे आपला उजवा आणि डावा मेंदू गुंतून राहतो पण अकार्यक्षम बनतो. आपला अटेन्शन स्पॅन अर्थात लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी खुंटत जातो.
याचा सर्वात मोठा धोका आहे तो विद्यार्थ्यांना! अभ्यासात लक्ष न लागणे, एका जागेवर स्थिर न बसणे, आपले मत अचूकपणे मांडता न येणे, त्यामुळे होणारी चिडचिड, मानसिक त्रास आणि कमी वयात जाड भिंगाचा चष्मा! यामुळे मुलांचे मानसिक आरोग्यही धोक्यात आहे.
यावर उपाय म्हणजे स्क्रीन टाइम ठरवून घेणे. मोबाईल हातात घेतल्यावर पाच मिनिटांनी आपण काय बघतोय आणि काय बघायचे होते यावर लक्ष देणे. डोळ्यांना विश्रांती मिळावी म्हणून दर अर्ध्या तासाने पाण्याचा हबका मारणे, आवडते छंद जोपासणे, चालायला जाणे, कामात गुंतवून घेणे, माहितीपर व्हिडीओ, लेख जाणीवपूर्वक शोधणे, पाहणे. यामुळे रील पाहण्याचे व्यसन कमी होईल आणि ब्रेन रॉटचा धोका टळेल.