Starlink Hiring: 'स्टारलिंक'ने भारतात या शहरात भरती सुरू केली, 'या' क्षेत्रातील कर्मचारी तातडीने हवेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 09:23 IST2025-11-01T09:22:11+5:302025-11-01T09:23:47+5:30
Starlink ने भारतात पहिली भरती मोहीम सुरू केली आहे. सेवा कधी सुरू होणार, वाचा सविस्तर.

Starlink Hiring: 'स्टारलिंक'ने भारतात या शहरात भरती सुरू केली, 'या' क्षेत्रातील कर्मचारी तातडीने हवेत...
अब्जाधीश एलन मस्क यांच्या मालकीची सॅटेलाइट ब्रॉडबँड कंपनी 'स्टारलिंक' आता भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. दूरसंचार विभाग आणि IN-SPACe कडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर, कंपनीने भारतातील आपल्या कामकाजाला वेग देण्यासाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
स्टारलिंकने आपल्या SpaceX करियर पोर्टल आणि LinkedIn वर अनेक प्रमुख पदांसाठी जाहिराती दिल्या आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व पदे कंपनीच्या भारतातील 'ऑपरेशनल हब' असलेल्या बंगळूरु शहरासाठी आहेत.
प्रमुख पदे : अकाउंटिंग मॅनेजर, पेमेंट्स मॅनेजर, सीनियर ट्रेझरी ॲनालिस्ट आणि टॅक्स मॅनेजर.
नोकरीचा प्रकार: कंपनीने स्पष्ट केले आहे की, ही सर्व पदे 'ऑन-साईट' म्हणजेच ऑफिसमधून काम करण्याची आहेत. 'रिमोट' किंवा 'हायब्रीड' काम करण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
याचबरोबर स्टारलिंक सेट बसविण्यासाठी तंत्रज्ञांची मोठी टीमही कंपनीला उभारावी लागणार आहे. हे भरती थोड्या काळाने विविध शहरांत, जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच स्टारलिंक हे महागच असणार आहे. दर महिन्याला ३००० ते ४००० रुपये बिलिंग आणि सेटअप करून देण्याचे ३० ते ४० हजार रुपये अशी रक्कम आकारली जाण्याची शक्यता आहे.
लॉन्च कधी होणार?
कंपनीची ही भरती मोहीम सूचित करते की, स्टारलिंक २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला भारतात आपली व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. ३०-३१ ऑक्टोबरला स्टारलिंकची ट्रायल आणि टेस्टिंग घेण्यात आली. भारत सरकारचे तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली हे झाले आहे.
स्टारलिंकच्या येण्यामुळे, एअरटेल-समर्थित वनवेब आणि जिओ सॅटेलाईट यांसारख्या कंपन्यांशी थेट स्पर्धा निर्माण होणार आहे. यामुळे भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागापर्यंत हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट सेवा पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.