काय आहे ऑटोनोमस डेटाबेस, ज्यामुळे Oracle ने १२ हजार भारतीयांना नोकरीवरून काढले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:28 IST2026-04-02T14:27:44+5:302026-04-02T14:28:04+5:30
जे कर्मचारी नवीन तंत्रज्ञान शिकतील, त्यांना मोठ्या संधी; इतरांना मात्र 'नारळ'..!

काय आहे ऑटोनोमस डेटाबेस, ज्यामुळे Oracle ने १२ हजार भारतीयांना नोकरीवरून काढले? जाणून घ्या...
Oracle Layoffs: अमेरिकेतील दिग्गज आयटी कंपनी Oracle मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे. आतापर्यंत जगभरातील सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी सुमारे १२ हजार कर्मचारी भारतातील आहेत. विशेष म्हणजे, ही कर्मचारी कपात केवळ खर्च कमी करण्यासाठी नसून, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या बदलांचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
AI आणि क्लाउडवर कंपनीचा भर
Oracle आता पारंपरिक सॉफ्टवेअर कंपनी म्हणून काम करण्याऐवजी आर्टिफिशीअल इंटेलिजन्स (AI) आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठी कंपनी बनण्याच्या दिशेने काम करत आहे. यासाठी कंपनी जगभरात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारत आहे. AI मॉडेल्स चालवण्यासाठी आणि ट्रेन करण्यासाठी महागडे GPU चिप्स, मोठ्या प्रमाणावर वीज, जमीन आणि कूलिंग सिस्टिमची आवश्यकता असते. त्यामुळे खर्चाचे संतुलन राखण्यासाठी कंपनी कर्मचारी संख्या कमी करत असल्याचे समोर आले आहे.
ऑटोमेशनमुळे नोकरकपात
तंत्रज्ञानातील ऑटोमेशन हा या बदलाचा सर्वात मोठा भाग आहे. पूर्वी डेटाबेस व्यवस्थापनासाठी मोठी टीम आवश्यक असायची. अपडेट, सिक्युरिटी, मॉनिटरिंग, बॅकअप अशी अनेक कामे मॅन्युअली केली जात होती. मात्र आता AI आधारित सिस्टम ही कामे स्वतःच करतात. त्यामुळे पूर्वी ज्या कामासाठी १० लोक लागायचे, तेच काम आता २-३ लोक आणि AI सिस्टम मिळून करू शकतात.
काय आहे ऑटोनोमस डेटाबेस आणि AI व्हेक्टर डेटाबेस?
ओरॅकलचे ऑटोनोमस डेटाबेस हे असे स्मार्ट सिस्टम आहे जे स्वतः अपडेट होते, स्वतः सिक्युरिटी सांभाळते आणि परफॉर्मन्स सुधारते. याशिवाय AI व्हेक्टर डेटाबेसमुळे सिस्टम टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ यांसारख्या अनस्ट्रक्चर्ड डेटामधील पॅटर्न ओळखू शकते आणि अर्थाच्या आधारावर शोध घेऊ शकते. त्यामुळे डेटा, AI आणि अॅप्लिकेशन एकाच प्लॅटफॉर्मवर काम करू शकतात.
कोडिंग आणि सपोर्ट क्षेत्रातही बदल
AI टूल्स आता कोड लिहिणे, बग शोधणे आणि सिस्टम मॉनिटरिंगसारखी कामे करू लागले आहेत. क्लाउड सिस्टम स्वतः स्केल होतात, समस्या ओळखतात आणि काही वेळा स्वतःच दुरुस्तही करतात. त्यामुळे कंपन्यांना मोठ्या टीम ठेवण्याची गरज कमी होत आहे. विशेषतः डेटाबेस अॅडमिन, सपोर्ट इंजिनिअर, टेस्टिंग आणि बेसिक कोडिंगशी संबंधित नोकऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे.
असे असेल भविष्यातील मॉडेल...
आता कंपन्या मोठ्या टीमऐवजी कमी पण अधिक कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देत आहेत. AI टूल्सच्या मदतीने एक इंजिनिअर पूर्वी पाच लोक मिळून करायचे तेवढे काम करू शकतो. त्यामुळे एंट्री लेव्हलसह मिड आणि सीनियर लेव्हलच्या नोकऱ्यांवरही परिणाम होऊ शकतो.
आयटी क्षेत्रात बदलाचे वारे...
तज्ज्ञांच्या मते, ही कर्मचारी कपात मंदी किंवा कंपनीच्या तोट्यामुळे होत नाही, तर तंत्रज्ञानातील बदलांमुळे होत आहे. आयटी क्षेत्र संपत नाही, पण वेगाने बदलत आहे. जे कर्मचारी AI, क्लाउड आणि नवीन तंत्रज्ञान शिकतील त्यांच्यासाठी भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध राहतील, मात्र जुन्या पद्धतीने काम करणाऱ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो.