एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:38 IST2025-10-09T06:37:49+5:302025-10-09T06:38:00+5:30
‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये डिजिटल प्रगतीचा उल्लेख

एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आज भारत गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य ठिकाण म्हणून उदयास आला असून, देशात आता एक जीबी डेटा चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. भारतातील डिजिटल प्रगती आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
‘इंडिया मोबाइल काँग्रेस’च्या उद्घाटनप्रसंगी मोदी यांनी सांगितले की, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांतील आपले यश दाखवते की, सरकार ‘डिजिटल फर्स्ट’ विचारसरणीशी किती बांधील आहे. भारतात गुंतवणूक, नवकल्पना आणि ‘मेक इन इंडिया’ साठी हा सर्वोत्तम काळ आहे. भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा दूरसंचार व ५जी बाजार आहे. भारताने स्वदेशी ४जी तंत्रज्ञान विकसित केले असून, अशी क्षमता प्राप्त करणाऱ्या जगातील ५ देशांत स्थान पटकावले. आज जवळपास प्रत्येक जिल्ह्यात ५जी सेवा पोहोचली आहे.
मोदी म्हणाले की, देशात आता सेमीकंडक्टर, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी प्रचंड संधी आहेत. सरकार ५जी, ६जी आणि सायबर सुरक्षा संशोधनाला पाठबळ देत आहे. त्याचा परिणाम म्हणून २०१४ पासून मोबाइल उत्पादनात २८ पट आणि निर्यातीत १२७ पट वाढ झाली आहे.
मोबाइल फोन देतोय अनेकांना रोजगार
मोदी म्हणाले की, भारताचे स्वदेशी तंत्रज्ञान निर्यातीसाठीही तयार आहे. हे आत्मनिर्भर भारताचे बळकटीकरण आहे आणि जगासमोर भारताला विश्वसनीय तंत्रज्ञान भागीदार म्हणून उभे करत आहे.
मोदी यांनी म्हटले की, ‘गेल्या दशकभरात, मोबाइल फोन उत्पादन क्षेत्राने लाखो प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत.’ यावेळी मोदी यांनी एका मोठ्या स्मार्टफोन उत्पादक कंपनीच्या ताज्या आकडेवारीचा संदर्भ दिला, ज्यात दर्शविले आहे की, ४५ भारतीय कंपन्या आता तिच्या पुरवठा साखळीचा भाग आहेत, ज्यामुळे सुमारे ३.५ लाख रोजगार निर्माण होत आहेत.
मोदी यांनी पुढे सांगितले की, ‘हा केवळ एकाच कंपनीचा आकडा नाही. आज देशात कितीतरी कंपन्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहेत. यात अप्रत्यक्ष संधी जोडल्या, तर आपण कल्पना करू शकतो की, रोजगाराचा हा आकडा किती मोठा असेल.’