गुगलने अलीकडेच त्यांची नवीन पिक्सेल १० सिरीज सादर केली आहे. यावेळी फोनमध्ये अनेक मोठे अपग्रेड पाहायला मिळत आहेत, परंतु ज्या फीचरची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे WhatsApp व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी सॅटेलाइट नेटवर्क सपोर्ट. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे मोबाईल सिग्नल किंवा वाय-फाय उपलब्ध नसलं तरीही तुम्ही WhatsApp कॉल करू शकाल.
गुगलने एक्स वर पोस्ट केलं आणि माहिती दिली की, हे सॅटेलाइट-आधारित WhatsApp कॉलिंग फीचर २८ ऑगस्टपासून उपलब्ध होईल, म्हणजेच त्याच दिवशी जेव्हा पिक्सेल १० सिरीज पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध होईल. हे फीचर एक्टिव्हेट केल्यावर, फोनच्या स्टेटस बारमध्ये एक सॅटेलाइट आयकॉन दिसेल, जो सांगेल की कॉल सॅटेलाइट नेटवर्कद्वारे केला जात आहे.
काय असतील अटी?
गुगलच्या मते, WhatsApp वर सॅटेलाइट कॉलिंग सध्या फक्त निवडक नेटवर्क कॅरियर्ससह काम करेल. याशिवाय, हे फीचर वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क देखील आकारले जाऊ शकतं. सॅटेलाइटद्वारे फक्त कॉल सुविधा उपलब्ध असेल की मेसेजिंग देखील शक्य असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अॅपलने आधीच त्यांच्या आयफोनमध्ये सॅटेलाइट फीचर देत आहे परंतु ते फक्त इमर्जन्सी टेक्स्ट पाठवण्यापुरते मर्यादित आहे. दुसरीकडे, गुगलचे हे पाऊल युजर्ससाठी महत्त्वाचं आहे कारण ते थेट WhatsAppवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकतील. हे विशेषतः अशा भागात खूप उपयुक्त ठरू शकते जिथे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब होतं.
स्मार्टवॉचमध्ये देखील सॅटेलाइट सपोर्ट
केवळ स्मार्टफोनच नाही तर पिक्सेल वॉच ४ एलटीई मॉडेल्सना देखील सॅटेलाइट नेटवर्कशी कनेक्ट करण्याची सुविधा दिली जाईल. यामुळे ते जगातील पहिले घड्याळ असेल जे थेट सॅटेलाइटशी कनेक्ट होऊ शकतं. या घड्याळात स्नॅपड्रॅगन W5 Gen 2 चिप वापरली गेली आहे, ज्यामुळे ते इमर्जन्सी मेसेज पाठवू शकतील.