आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 07:01 IST2025-10-09T07:01:28+5:302025-10-09T07:01:54+5:30
‘यूपीआय लाइट’ या प्रणालीमुळे बँकेच्या मुख्य सर्व्हरवरील ताण कमी राहतो आणि व्यवहार जलद होतात.

आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आता ‘वेअरेबल’ म्हणजेच डोळ्यावर घालायच्या स्मार्ट चष्म्यांद्वारेही यूपीआय पेमेंट करता येणार आहे. फक्त क्यूआर कोड स्कॅन करा आणि आवाजात आदेश द्या, म्हणजेच ‘बोला आणि पैसे द्या’. या पद्धतीने लहान रकमेचे व्यवहार मोबाइल किंवा पिन टाकल्याशिवाय करता येतील, असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने सांगितले आहे.
‘यूपीआय लाइट’ या प्रणालीमुळे बँकेच्या मुख्य सर्व्हरवरील ताण कमी राहतो आणि व्यवहार जलद होतात.
रोजच्या खरेदीसाठी सोयीचे; सुरक्षित खरेदी करा
एनपीसीआयने यासंदर्भात एक व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ‘पाहा, बोला, पैसे द्या’, असा संदेश दिला आहे. या सुविधेमुळे वापरकर्ते फोनशिवाय आणि पिन न टाकता फक्त स्मार्ट चष्म्याद्वारे सुरक्षित व्यवहार करू शकतील. रोजच्या खरेदी, खाद्यपदार्थ, प्रवास आदींसाठी हे पेमेंट सोयीचे ठरणार आहे.
सर्व ॲप्सवर दिसणार तुमचे यूपीआय ऑटोपे व्यवहार
यूपीआय व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी एनपीसीआयने बदल केला आहे. यानुसार, वापरकर्त्यांना आता त्यांचे सर्व यूपीआय ऑटोपे मॅण्डेट्स कोणत्याही ॲपवर पाहता येतील. सध्या जर वापरकर्त्याने एखाद्या ॲपवर ऑटोपे सेट केला असेल, तर तो व्यवहार फक्त त्या ॲपवरच दिसतो.
नवीन नियमानुसार वापरकर्ता आपल्या सर्व सक्रिय ऑटोपे व्यवहारांची माहिती कोणत्याही यूपीआय ॲपवर पाहू शकेल. ही सुविधा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व यूपीआय ॲप्समध्ये लागू होणार आहे. गरज पडल्यास हे ऑटोपे व्यवहार एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये पोर्ट करणेही शक्य होणार आहे.