Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI वापरताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:03 IST2026-03-01T13:03:01+5:302026-03-01T13:03:23+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआयपासून दूर राहणे शक्य नाही, पण त्याचा वापर समजून घेऊन करणे गरजेचे आहे.

lokmat ai series what should students be careful about when using artificial intelligence | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI वापरताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI वापरताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. स्मार्टफोन, इंटरनेट आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) हे शिक्षणाचा भाग बनत चालले आहे. गुगल सर्च, यूट्यूब सजेशन्स, ग्रामर करेक्शन, ऑनलाईन टेस्ट, व्हाइस असिस्टन्स हे सगळे एआयवरच काम करतात. एका अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे की, दररोज वापरल्या जाणाऱ्या डिजिटल अॅप्सपैकी सुमारे ७० टक्के अॅप्समध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एआय वापरला जातो. त्यामुळे एआयपासून दूर राहणे शक्य नाही, पण त्याचा वापर समजून घेऊन करणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की एआय म्हणजे स्वतः विचार करणारा मेंदू नाही. एआय हा डेटा आणि अल्गोरिदम यांवर चालतो. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती (बिग डाटा) आणि त्यावर प्रशिक्षित केलेले मॉडेल्स यांच्या आधारे एआय उत्तर देत असतो. म्हणजेच एआय 'समजून' उत्तर देत नाही, तर आधीच्या माहितीच्या आधारावर शक्य तितके योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच एआयने दिलेले उत्तर नेहमीच अचक असेल, याची खात्री नसते.

दुसरी महत्त्वाची काळजी म्हणजे डेटा अचूकतेची आणि बायसची (Bias). संशोधनानुसार, अनेक एआय मॉडेल्समध्ये ५ ते १० टक्केपर्यंत तथ्यात्मक चुका आढळतात, विशेषतः अभ्यासक्रमाशी संबंधित किंवा स्थानिक संदर्भातील प्रश्नांमध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयकडून मिळालेली माहिती थेट वापरण्याऐवजी ती पाठ्यपुस्तक, शिक्षक किंवा विश्वासार्ह स्रोतांशी पडताळून पाहणे आवश्यक आहे.

तिसरी आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे डेटा सुरक्षा (Data Privacy) एआय टुल्स वापरताना आपण जे लिहितो, ते डेटा स्वरूपात संग्रहित होऊ शकते. अनेक तज्ज्ञांच्या मते, ६० टक्क्यांपेक्षा जास्त मोफत एआय साधने वापरकर्त्यांचा डेटा विश्लेषणासाठी वापरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची वैयक्तिक माहिती नाव, शाळा, रोल नंबर, फोन नंबर, ई-मेल किंवा पासवर्ड एआय व्यासपीठावर देणे टाळावे. डिजिटल सुरक्षितता ही आजच्या काळातील एक महत्त्वाचे शैक्षणिक कौशल्य आहेत.

चौथी बाब म्हणजे शैक्षणिक प्रामाणिकपणा (Academic Integrity). एआयचा वापर करून थेट निबंध, प्रोजेक्ट किंवा उत्तरपत्रिका तयार करणे म्हणजे स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेला फसवणे होय. एका सर्वेक्षणानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी सतत एआयवर अवलंबून राहून असाइनमेंट पूर्ण केली, त्यांची Problem-Solving क्षमता आणि गुंतागुंत विचार करण्याची (Critical thinking) कौशल्ये हळूहळू कमी झाल्याचे दिसून आले आहे. एआय हा शिकण्याचा सपोर्ट सिस्टम असावा, रिप्लेसमेंट नव्हे.

पाचवी आणि अंतिम काळजी म्हणजे मानवी कौशल्यांचा विकास. एआय वेगवान आहे, पण तो संवेदनशील नाही. सर्जनशीलता, मूल्ये, नैतिकता, जिज्ञासा आणि निर्णयक्षमता हे गुण एआयमध्ये मुळीच नसतात. भविष्यातील नोकऱ्यांमध्ये केवळ तंत्रज्ञानाची माहिती नव्हे, तर एआयसोबत काम करण्याची समज महत्त्वाची ठरणार आहे.

शेवटी असे म्हणता येईल की एआय हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक शक्तिशाली साधन आहे. योग्य मार्गदर्शन, मर्यादा आणि विचारपूर्वक वापर केला, तर एआय शिक्षण अधिक प्रभावी करू शकतो यात शंका नाही.

पण कुठलाही विचार न करता वापर केला, तर तो शिकण्याऐवजी आपल्या आळशीपणाला खतपाणी घालू शकतो. म्हणूनच कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) वापरा मात्र तंत्रज्ञानासोबत आपली बुद्धीही वापरा. त्याचा वापर नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत होईल. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे डोळसपणे पाहावे.

- इंजि. अविनाश जाधव (Al & Technology Educator)
 

Web Title : लोकमत एआई: छात्रों के लिए कृत्रिम बुद्धिमत्ता का उपयोग करने के दिशानिर्देश

Web Summary : एआई छात्रों के लिए एक शक्तिशाली उपकरण है, लेकिन इसकी सीमाओं को समझना महत्वपूर्ण है। एआई से उत्पन्न जानकारी को सत्यापित करें, व्यक्तिगत डेटा की सुरक्षा करें, अत्यधिक निर्भरता से बचें और महत्वपूर्ण सोच जैसे मानवीय कौशल विकसित करें। सीखने को बढ़ाने के लिए एआई का सावधानीपूर्वक उपयोग करें, इसे प्रतिस्थापित न करें।

Web Title : Lokmat AI: Student Guidelines for Using Artificial Intelligence Wisely

Web Summary : AI is a powerful tool for students, but understanding its limitations is crucial. Verify AI-generated information, protect personal data, avoid over-reliance, and develop human skills like critical thinking. Use AI thoughtfully to enhance learning, not replace it.