फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:46 IST2026-01-08T13:45:47+5:302026-01-08T13:46:30+5:30
तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून 'टॅप-टू-पे' सुविधेचा वापर करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
जर तुम्हाला फिरायची आवड असेल आणि प्रवासादरम्यान तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून 'टॅप-टू-पे' सुविधेचा वापर करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही महिन्यांत डिजिटल पेमेंट फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला आहे, ज्याला 'घोस्ट टॅपिंग' असे म्हटले जात आहे. विशेषतः पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी हा स्कॅम वेगाने पसरत असून, सायबर गुन्हेगार तुमच्या नकळत खात्यातील पैसे लंपास करत आहेत.
काय आहे हा 'घोस्ट टॅपिंग' स्कॅम?
जसजसा कॉन्टॅक्टलेस पेमेंटचा ट्रेंड वाढला आहे, तसतसे सायबर ठग अधिक हायटेक झाले आहेत. 'घोस्ट टॅपिंग'मध्ये स्कॅमर एनएफसी तंत्रज्ञानाचा वापर करतात. यामध्ये तुमची कार्ड डिटेल्स किंवा ओटीपीची गरज नसते. जर तुमच्या कार्डवर किंवा स्मार्टफोनमध्ये 'टॅप-टू-पे' फीचर ऑन असेल, तर गुन्हेगार तुमच्या अगदी जवळ उभे राहून वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे ट्रांजॅक्शन पूर्ण करू शकतात.
फसवणूक कशी केली जाते?
हा फ्रॉड पूर्णपणे एनएफसी तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्याचा वापर Apple Pay, Google Pay आणि Samsung Wallet सारखी प्लॅटफॉर्म्स करतात. हे सायबर गुन्हेगार आपल्याकडे मॉडिफाइड स्मार्टफोन किंवा पोर्टेबल एनएफसी रीडर ठेवतात. विमानतळ, गजबजलेले बाजार, फेस्टिव्हल किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात हे लोक तुमच्या जवळ काही सेकंद उभे राहतात. बऱ्याचदा बनावट दुकानदार किरकोळ पेमेंटच्या बहाण्याने कार्ड टॅप करायला लावतात आणि तुमच्या नकळत मोठी रक्कम कापली जाते.
पर्यटक का ठरतात सोपे शिकार?
प्रवासात घाईघाईने पेमेंट करण्यासाठी लोक 'टॅप-टू-पे'वर जास्त अवलंबून असतात. गर्दीमुळे कोणाशी तरी धक्का लागला तरी संशय येत नाही. परकीय चलनाची नीट माहिती नसल्यामुळे किती पैसे कापले गेले, याचा अंदाज लगेच येत नाही. गडबडीत बँकेचे ट्रान्झॅक्शन अलर्ट्स त्वरित तपासले जात नाहीत.
कसे राहाल सुरक्षित?
१. एनएफसी बंद ठेवा: प्रवासादरम्यान गरज नसेल तेव्हा स्मार्टफोनमधील एनएफसी फीचर बंद ठेवा.
२. RFID-ब्लॉकिंग वॉलेट: तुमच्या कार्डच्या सुरक्षिततेसाठी 'RFID-ब्लॉकिंग' वॉलेट किंवा कार्ड स्लीव्हचा वापर करा, जेणेकरून तुमचे कार्ड बाहेरून स्कॅन करता येणार नाही.
३. बायोमेट्रिक सिक्युरिटी: मोबाईल वॉलेट वापरताना फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक ऑन ठेवा.
४. अलर्ट चालू ठेवा: बँक अॅपमध्ये इन्स्टंट ट्रांजॅक्शन अलर्ट चालू ठेवा जेणेकरून प्रत्येक रुपयाचा हिशोब समजेल.
५. मर्यादा सेट करा: बँकेच्या अॅपमध्ये जाऊन कॉन्टॅक्टलेस पेमेंटची मर्यादा कमी करा.
'टॅप-टू-पे' अजूनही सुरक्षित आहे का?
तज्ज्ञांच्या मते, टॅप-टू-पे अजूनही कार्ड स्वाइप करण्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे कारण यात एन्क्रिप्शन असते. मात्र, तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी मानवी सावधगिरीला पर्याय नाही. थोडीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक फटक्यापासून वाचवू शकते.