लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हाट्सॲपवर (WhatsApp) ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात असल्याचा दावा पेटीएमचे (Paytm) संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी केला आहे. 'Meta AI'च्या वापरामुळे तुमच्या ग्रुप चॅट्सची माहिती लीक होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, व्हाट्सॲपने हे दावे फेटाळले असून, युजर्सच्या प्रायव्हसीला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
विजय शेखर शर्मा यांचा दावा काय?काही दिवसांपूर्वी विजय शेखर शर्मा यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून व्हाट्सॲप युजर्सना सतर्क केलं होतं. त्यांच्या पोस्टनुसार, व्हाट्सॲप ग्रुपमध्ये 'Meta AI' मुळे तुमच्या चॅट्सची माहिती वाचली जाऊ शकते. त्यांनी 'Advanced Chat Privacy' हे फीचर ऑन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, हे फीचर बाय-डिफॉल्ट बंद असतं, पण ते चालू केल्यास 'Meta AI' तुमच्या चॅट्स वाचू शकणार नाही. शर्मा यांनी या संदर्भात एक स्क्रीनशॉटही शेअर केला होता.
व्हाट्सॲपचं स्पष्टीकरणशर्मा यांच्या या दाव्यानंतर व्हाट्सॲपने लगेचच स्पष्टीकरण दिलं. व्हाट्सॲपने म्हटलं आहे की, "असे अनेक दावे यापूर्वीही झाले आहेत, पण ते खरे नाहीत." व्हाट्सॲपनुसार, 'Meta AI' तुमच्या चॅट्स किंवा कॉन्टॅक्ट्सची माहिती ॲक्सेस करू शकत नाही. ते फक्त त्याच गोष्टी वाचू शकतं, ज्या तुम्ही स्वतः 'Meta AI' सोबत शेअर करता.
व्हाट्सॲपने पुढे सांगितलं की, तुम्ही एखाद्या चॅटमध्ये 'Meta AI'चा उल्लेख केल्याशिवाय ते ॲक्टिव्ह होत नाही. तसेच, व्हाट्सॲपवरील सर्व मेसेज बाय-डिफॉल्ट 'एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड' असतात. याचा अर्थ, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत चॅट करत आहात, फक्त ती व्यक्तीच तुमचे मेसेज वाचू किंवा शेअर करू शकते.
'Advanced Chat Privacy' फीचर कसे सुरू करावे?तुम्हाला तुमच्या ग्रुप चॅटची प्रायव्हसी अधिक सुरक्षित करायची असल्यास, तुम्ही 'Advanced Chat Privacy' हे फीचर सुरू करू शकता.
- व्हॉट्सॲपवर तुमचा ग्रुप चॅट उघडा.
- ग्रुपच्या नावावर क्लिक करा.
- खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला 'Advanced Chat Privacy' हा पर्याय दिसेल.
- या पर्यायावर टॅप करून तुम्ही हे फीचर सुरू करू शकता.
या फीचरचे फायदे काय?हे फीचर सुरू केल्यावर ग्रुपमध्ये कोणाही दुसऱ्या व्यक्तीला काही गोष्टी करता येणार नाहीत. ग्रुपमधील मीडिया फाइल्स (फोटो, व्हिडिओ) त्यांच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करता येणार नाहीत.
कोणीही '@Meta AI' चा उल्लेख करून न वाचलेल्या मेसेजचा सारांश (summary) काढण्यासाठी 'AI' फीचरचा वापर करू शकणार नाही. तसेच ग्रुपमधील चॅट एक्सपोर्ट करता येणार नाही.