Facebook's India head of public policy Ankhi Das quits company | फेसबुक इंडिया पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा; पक्षपात केल्याचा होता आरोप

फेसबुक इंडिया पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा; पक्षपात केल्याचा होता आरोप

ठळक मुद्देअंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही.

नवी दिल्ली : फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच अंखी दास वादात अडकल्या होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसनेफेसबुक मुख्यालयात तक्रार दाखल केली होती.

अंखी दास यांच्यावर हेट कंटेंट ब्लॉक करण्यावरून भाजपाची बाजू घेतल्याचा आरोप होता. याबाबत काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर फेसबुकने अंखी दास यांच्यावरील आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण दिले होते.

अंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे एक निवेदन समोर आले आहे. आता अंखी दास या पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर पाहणार आहेत, असे सांगितले जात आहे. फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "अंखी दास यांनी पब्लिक सर्व्हिसमध्ये आपले फ्युचर घडविण्यासाठी फेसबुकचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे."

फेसबुक इंडियाच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, अंखी दास या भारतातील सुरुवातीच्या फेसबुक कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत आणि भारतात कंपनीच्या वाढीसाठी  ९ वर्षांपासून त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी म्हटले आहे की, "गेल्या दोन वर्षांपासून अंखी दास आपल्या नेतृत्वात काम करत होत्या. त्यांनी खूप योगदान दिले. त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले आहेत."

अंखी दास यांच्यावर फेसबुकच्या हेट स्पीच पॉलिसीला भाजपाच्या बाजूने केल्या आरोप होता. मात्र फेसबुकनेही हा आरोप फेटाळून लावला आहे. अंखी दास यांनी आपल्या सहका-यांना एक ईमेल केला आहे. त्यामध्ये त्यांनी २०११ पासूनच्या आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच, भारतातील लोकांना जोडण्याचे ध्येय पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०११ मध्ये फेसबुक भारतात एक छोटीशी स्टार्टअप होती, असे सांगत फेसबुकचा शोध लावल्याबद्दल मार्क झुकरबर्ग यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही.
 

Web Title: Facebook's India head of public policy Ankhi Das quits company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.