मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:03 IST2025-10-07T14:02:47+5:302025-10-07T14:03:23+5:30
सरकारी रिपोर्ट तयार करताना डेलॉइटने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलचा वापर केला होता आणि AIच्या 'हॅल्युसिनेशन'मुळे या चुका झाल्या.

मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
जागतिक स्तरावरची मल्टीनॅशनल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी डेलॉइटच्या एका मोठ्या चुकीमुळे कंपनीला आता ऑस्ट्रेलियन सरकारला रिफंड द्यावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने ₹२.९ कोटी (४,४०,००० डॉलर) फी देऊन डेलॉइटकडून एक महत्त्वाचा सरकारी रिपोर्ट तयार करून घेतला होता. मात्र, या रिपोर्टमध्ये मोठ्या चुका आणि बनावट माहिती आढळल्यामुळे कंपनीने आता घेतलेल्या फीचा एक मोठा हिस्सा सरकारला परत करण्यास सहमती दर्शवली आहे.
डेलॉइटने कबूल केले आहे की, सरकारी रिपोर्ट तयार करताना त्यांनी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलचा वापर केला होता आणि AIच्या 'हॅल्युसिनेशन'मुळे या चुका झाल्या.
नेमका कोणता रिपोर्ट होता?
ऑस्ट्रेलियाच्या डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट अँड वर्कप्लेस रिलेशन्सने डेलॉइटला Targeted Compliance Framework आणि संबंधित आयटी प्रणालीचा आढावा घेण्याचे काम दिले होते. ही प्रणाली बेरोजगार व्यक्तींनी कल्याणकारी योजनांच्या अटी पूर्ण न केल्यास त्यांच्यावर स्वयंचलित दंड लावते.
डेलॉइटने जुलै २०२५ मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला होता. सुरुवातीला यात 'सिस्टम डिफेक्ट्स' आणि 'कायद्यातील विसंगती' अशा गंभीर त्रुटी नमूद केल्या गेल्या होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूने तपासणी केल्यावर यात खोटे संदर्भ आणि बनावट उदाहरणे आढळली.
AIच्या 'हॅल्युसिनेशन'चा परिणाम
सिडनी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ख्रिस्तोफर रज यांच्या मते, ही चूक एआय हॅल्युसिनेशनचा परिणाम आहे. म्हणजेच जेव्हा एआय डेटावर आधारित खोटी माहिती तयार करतो.
शुक्रवारी DEWRने रिपोर्टची अपडेटेड आवृत्ती जारी केली. त्यात डेलॉइटने हे मान्य केले आहे की, रिपोर्टचा काही भाग 'Azure OpenAI GPT4o' मॉडेलच्या मदतीने तयार करण्यात आला होता. चुका आढळल्यानंतर आता डेलॉइट एकूण फीमधील शेवटचा हप्ता सरकारला परत करणार आहे.