तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:11 IST2025-11-25T18:54:32+5:302025-11-25T19:11:34+5:30
काम असो, शिक्षण, गेमिंग किंवा मनोरंजन... लॅपटॉपशिवाय पान हालत नाही. मात्र, अनेक जण सोयीसाठी जी एक चूक करतात, ती त्यांच्या महागड्या डिव्हाईससाठी मोठे संकट ठरते.

तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
आजच्या युगात लॅपटॉप हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. काम असो, शिक्षण, गेमिंग किंवा मनोरंजन... लॅपटॉपशिवाय पान हालत नाही. मात्र, अनेक जण सोयीसाठी जी एक चूक करतात, ती त्यांच्या महागड्या डिव्हाईससाठी मोठे संकट ठरते. तुम्हालाही बेडवर किंवा उशीवर लॅपटॉप ठेवून काम करण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. या सवयीमुळे तुमच्या लॅपटॉपचा मदरबोर्ड जळू शकतो आणि दुरुस्तीचा खर्च तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतो.
बेडवर लॅपटॉप वापरणे का आहे धोकादायक?
काही गंभीर चुका तुमच्या लॅपटॉपचे आयुष्य कसे कमी करतात. प्रत्येक लॅपटॉपमध्ये गरम हवा बाहेर फेकण्यासाठी खालील बाजूस 'एयर वेंट' दिलेले असतात. तुम्ही जेव्हा बेड, सोफा किंवा ब्लँकेटसारख्या मऊ पृष्ठभागावर लॅपटॉप ठेवता, तेव्हा हे वेंट पूर्णपणे ब्लॉक होतात. गरम हवा बाहेर न पडल्याने लॅपटॉप पटकन गरम होतो. यामुळे चिपसेट आणि महत्त्वाचे मदरबोर्डवर प्रचंड ताण येतो, ज्यामुळे ते जळण्याची शक्यता वाढते आणि डिव्हाईसचा परफॉर्मन्सही कमी होतो.
जेव्हा हवा खेळती राहत नाही, तेव्हा लॅपटॉपला थंड ठेवण्यासाठी 'कूलिंग फॅन' अधिक वेगाने फिरू लागतो. यामुळे फॅन लवकर खराब होतो आणि सिस्टम वारंवार स्लो होते किंवा लॅग होते. जास्त वेळ असा वापर केल्यास फॅन आणि मदरबोर्ड दोन्हीचे नुकसान होते.
धुळीमुळे होऊ शकते सर्किट डॅमेज
बेडशीट, उशी किंवा ब्लँकेटमधील बारीक धूळ आणि तंतू लॅपटॉपच्या आत जातात. ही धूळ फॅन, RAM स्लॉट, थर्मल पेस्ट आणि मदरबोर्डवर जमा होते. यामुळे हळूहळू सर्किटरी प्रभावित होते आणि लॅपटॉप वारंवार हँग होतो किंवा अचानक बंद पडतो.
स्क्रीन आणि हिंज तुटण्याची भीती
बेडवर काम करताना अनेकदा स्क्रीनचा अँगल योग्य नसतो. कालांतराने डिस्प्लेवर दाब वाढतो आणि हिंज ढिले होतात. यामुळे डिस्प्लेवर लाईन्स पडणे, स्क्रीन तुटणे किंवा हिंज दुरुस्त करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. मऊ पृष्ठभागावर लॅपटॉप अस्थिर असतो. किंचित हालचाल झाली तरी लॅपटॉप खाली पडून मोठा डॅमेज होऊ शकतो. तसेच, बेडवर चहा, कॉफी किंवा पाण्याची बाटली जवळ असल्यास, लिक्विड सांडून मदरबोर्ड 'शॉर्ट' होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
लॅपटॉप सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?
या महागड्या डिव्हाईसचे आयुष्य वाढवण्यासाठी लॅपटॉपचा वापर नेहमी कडक आणि सपाट पृष्ठभागावर करावा. बेडवर काम करण्याची गरज असल्यास, लॅपटॉप स्टँड किंवा चांगल्या 'कूलिंग पॅड'चा वापर निश्चितपणे करा. दर ६ ते १२ महिन्यांनी लॅपटॉपची सर्व्हिसिंग करून घ्या आणि त्यातील धूळ काढून टाकावी. तुम्ही घेतलेली ही थोडीशी काळजी तुमच्या लॅपटॉपला दीर्घकाळ सुरक्षित ठेवेल आणि तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्यापासून वाचवेल.