What do you say .. The 'it' order of the District Collector has not reached the schools in the district | काय म्हणता.. जिल्हाधिकार्‍यांचा 'तो' आदेश जिल्ह्यातील शाळांना मिळालाच नाही

काय म्हणता.. जिल्हाधिकार्‍यांचा 'तो' आदेश जिल्ह्यातील शाळांना मिळालाच नाही

 

सोलापूर; काय म्हणता... पालकमंत्र्यांनी शाळाबंदी जाहीर केल्यानंतरही गुरुवारी शाळांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली. शाळा बंद झाल्या आहेत हे विद्यार्थी व शिक्षकांना कोण सांगणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दुपारी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आल्यावर 7 मार्च पर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रात्री उशिरा या निर्णयाचा आदेश जारी केला. पण हा आदेश शाळांपर्यंत पोहोचलाच नाही.

दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत शाळांना परिपत्रक पाठविणे गरजेचे होते, पण ही माहिती शाळांपर्यंत गेलीच नसल्याने सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक शाळांवर आले. पण आजपासून बंद असल्याचे प्रवेशद्वारावर सांगण्यात आल्याने विद्यार्थी आल्यापावली परतले. शहर व ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. जिल्हाधिकारी रात्री आदेश काढू शकतात तर शिक्षण विभाग सकाळी बारा वाजले तरी झोपा काढते काय? असा सवाल पालकांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी कोणती भूमिका घेतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: What do you say .. The 'it' order of the District Collector has not reached the schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.